पुणे 12 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी आळंदीत वारकऱ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी वारकऱ्यांना पवित्र असलेल्या इंद्रायणी नदीला प्रदुषणमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. हे मी माझं कर्तव्य समजतो असंही त्यांनी सांगितलं होतं. यानंतर पवार यांनी लगेच सूत्र फिरवली आणि तिसऱ्याच दिवशी पुण्यात संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. शरद पवार हे हिंदू विरोधी आहेत असं पत्रक निघाल्यामुळे पवारांचा हा कार्यक्रम चर्चेत आला होता. समतेची शिकवण देणारा भागवत धर्म हा काही लोकांना कळाच नाही असा टोलाही त्यांनी लगावला होता. मी मंदिरात जातो मात्र त्याची जाहीरात करत नाही. देव हा माणसांमध्ये रंजल्या गांजल्यांमध्ये पाहावा ही संतांची शिकवण आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. इंद्रायणी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी आता खुद्द पवारांनीच पुढाकार घेतल्यामुळे अधिकाऱ्यांचेहे धाबे दणाणले आहेत.
चंद्रभागा नदीच्या उपनद्यांच्या शुद्धीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘नमामि चंद्रभागा’ हे अभियान राबवलं जात आहे. त्याच संदर्भात त्यांनी पुण्यातल्या साखर संकुलात आढावा बैठक घेतली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
रोहित पवारांची आमदारकी धोक्यात? न्यायालयाची नोटीस जारी
या बैठकीत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त म्हैसेकर व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी नद्या प्रदूषित होण्याची कारणं सांगून त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचे एक सादरीकरण केलं.
इंद्रायणी व इतर नद्यांच्या काठांवर असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधून नद्यांमध्ये येणारे प्रदुषित पाणी व कचरा तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीचे जल प्रदूषणापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
परळीत तब्बल 4 हजार झाडाची कत्तल, राखेच्या चोरीसाठी झाडांचा बळी
या सर्व कामांना वेग देऊन ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करा असा सल्ला शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दिला. यावर देशात आणि जगात नवीन काय प्रयोग झाले. यात लोकांचा सहभाग कसा वाढेल हे बघा असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. शरद पवार हे त्यांच्या कामाच्या झपाट्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली ही की ती टास्क समजून ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असं बोललं जातं. त्यामुळे अधिकारीही कामाला लागले आहेत.