रायचंद शिंदे, प्रतिनिधी
पुणे, 28 जानेवारी : राम राम हा आदराचा शब्द आहे. मात्र, जय श्रीराम म्हटलं की, धडकी भरतेय असं म्हणत जय श्रीराम म्हणण्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी विरोध करत नव्या वादाला तोंड फोडलंय. तर कालचा भारत चांगला होता. मात्र, आजचा भारत दुषित केल्याची खंत व्यक्त करत देशात रंग,जातीवरुन राजकारण केलं जातं. मात्र, यापलीकडेही देश आहे, याचा विचार व्हायला हवा, असे म्हणत अमोल मिटकरींनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधाला.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे साहेबराव बुट्टेपाटील स्मुर्ती व्याख्यानमाला कार्यक्रमात "उज्ज्वल भारताचे कालचे आजचे आणि उद्याचे स्वप्न" या विषयावर मिटकरींनी व्याखान दिले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित होते.
काय म्हणाले अमोल मिटकरी -
राजगुरुनगर येथील साहेबराव बुट्टेपाटील स्मुर्ती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरींनी जय श्रीराम म्हणल्यावर धडकी भरतेय असं म्हटलं. आंदोलनावेळी जय श्रीराम म्हटलं जातं. मग रामाने दहशत शिकवलीय का? रामाने सावत्र भाऊ असलेल्या भरताला नंदीग्रामची गादी दिली. मग ज्याचं जय श्रीराम वर प्रेम असेल त्यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाला दोन एकर शेती तरी द्यावी. रामाने भावाचा आदर केला मग जय श्रीराम करणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. जसं वंदे मातरम या नावाची दहशत तशीच जय श्रीरामच्या नावाची दहशत माजविण्याचे काम या सरकारमधील लोक करत असल्याचा आरोप करत जय श्रीराम म्हणाऱ्यांना मिटकरींनी खडेबोल सुनावले.
तसेच राज्य सरकार स्थापनेची राजभवनात नोंद नसल्यावरुन अमोल मिटकरींनी भाजपावर निशाणा साधला. हा भाजपाचा प्लान असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राज्यपालांना वादग्रस्त विधानं करायला लावुन महाराष्ट्राचे लक्ष दुसरीकडे भरकटविण्यासाठी तयार केल्याचा आरोप मिटकरींनी केला. राज्यपालांनी महाराष्ट्र करमत नसल्याचे पत्र पंतप्रधानांना दिल. मात्र, हे पत्र राष्ट्रपतींना द्यायला हवं होतं. राज्यपालांची हकालपट्टी व्हायला पाहिजे होती. पण राज्यपालांना साडीचोळीचा मान देऊन पाठविण्याचे काम केलं जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन राज्यपाल बदलाची ठरवुन केलेली ही भाजपाची खेळी असल्याचा गंभीर आरोपही मिटकरींनी केला.
हेही वाचा - शिंदे-भाजपला धडकी भरवणारे प्रकाश आंबेडकरांचे विधान, राष्ट्रवादी-काँग्रेसलाही दिला सल्ला
सुधीर मुनगंटीवारांची केली नक्कल -
तर वंदे मातरम् बोलण्यावरुन अमोल मिटकरींनी मंत्री सुधीर मुनगंटीवारांची नक्कल भर कार्यक्रमात केली. वंदे मातरम् म्हणण्याचा अट्टाहास कशासाठी केला जात आहे. सुधीर मुनगंटीवार आणि किरीट सोमय्या यांनी वंदे मातरम् हे शब्द स्पष्ट बोलुन दाखवावे, त्यांना हसन मुश्रीफ हाच शब्द म्हणता येत नाही. वंदे मातरम् काय बोलणार, असा पलटवारही मिटकरींनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra politics, Mla, NCP, Pune