पुणे, 12 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि देशातील जनतेला एकात्मतेचा संदेश दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबाद (Aurangabad) आणि ठाणे (Thane) येथे घेतलेल्या सभांमध्ये शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप केला होता. राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरुन महाराष्ट्र पोलीसही सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यातील आणि देशातील जनतेला एकात्मता आणि एकजुटीने राहण्याचं आवाहन केलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
"या देशात विविधतेत सौंदर्य आहे आणि ते सांभाळायचं असेल तर विविध धर्माची फुलं आहेत ती सांभाळायला हवी. जगात, देशात काही परिस्थिती असो आम्ही मात्र आमच्या भागात एकतेचा संदेश देतो. जगात विचित्र परिस्थिती आहे. रशिया युक्रेन सारख्या छोट्या देशावर हल्ला करतोय. मूलं-बाळ मारली जाताहेत. मानवता संपली की काय? असं वाटतंय. दक्षिणेत काय स्थिती आहे? श्रीलंकेत नेतृत्व करणाऱ्यांना लपून बसावं लागतंय. उत्तरेत जो देश आपल्यासोबत स्वतंत्र होतो तिथे काय अवस्था आहे? तरुण मुलगा पंतप्रधान होऊन स्थिती बदलायचा प्रयत्न करतो पण त्याला हटवलं जातं", असं शरद पवार म्हणाले.
(पनीर खाताय तर सावधान! मुंबईकरांच्या जेवणात बनावट पनीर)
"आम्ही मॅच बघायला कराचीला गेलो होतो. तेव्हा खेळाडू आम्हाला पाकिस्तानचा काही भाग बघायला घेऊन गेले. नाष्टा करायला तिथे खेळाडूंचे पैसे घेतले नाहीत. हे तुम्हाला पटणार नाही. पण सामान्य माणसाचा आपल्याला विरोध नाही. बहुसंख्य समाजाला शांतता हवीय. तिथे गेले की ते त्यांच्या भारतातल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आसुसलेले आहेत", असं शरद पवारांनी सांगितलं.
"नेतृत्व चुकीच्या हातात गेलं की देशाचं वाटोळं होतं. स्वांतंत्र्याच्या लढ्यात अब्दुल कलाम, आझाद सुद्धा होते. इंग्रजांना सुद्धा देश सोडून जावं लागलं होतं. कुणी देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवत असेल तर तुम्हाला-मला एक व्हावं लागेल. काय वाटेल ती किंमत देऊ पण देशाची एकी संकटात जाऊ देणार नाही", असं शरद पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, NCP, Raj Thackeray, Sharad pawar speech