पुणे, 25 जून : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच आमदार गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला आहे.
'गोपीचंद पडळकर यांचे राजकीय स्टेटमेंट होतं. त्यांचं विधान त्यांच्याच नेत्यांना चुकीचं वाटलं. पवार साहेब जनतेच्या हृदयात बसले आहे. गेल्या 55 वर्षापासून ते सामाजिक काम करत आहेत. पडळकरांचं वय नाही तेवढे दिवस पवार साहेब समाजहिताचं काम करत आहेत. त्यामुळं अशा मोठ्या लोकांच्या विरोधात बोलल्यावर आपली राजकीय पोळी भाजेल. टीव्हीवर आणि पेपरमध्ये येऊ असं काहींना वाटतं आहेत. त्यामुळं ते खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत,' असा पलटवार रोहित पवार यांनी केल आहे.
'आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. गोपीचंद चुकले हे त्यांच्या नेत्यांनी दाखवून दिलं आहे.पवार साहेबांवरील वक्तव्यानं दुःख नक्कीच वाटणार. चीड नक्कीच येते,' असही रोहित पवारांनी म्हटलं आहे. अशा खालच्या पातळीचं राजकारण युवकांना चालणार नाही. आम्हाला सकारात्मक, राजकारण जनतेच्या हिताचे राजकारण करायचं आहे. धोरणात्मक निर्णयावर बोला. आम्ही त्यांचे स्वागत करू. काहीजण युवापिढीचा राजकीय फायदा घेतात आणि राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
'गोपीचंद पडळकर हे दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत. त्यांचे नेते त्यांना जे काय बोलायचे ते बोलले. त्यामुळं त्यांच्यावर पुन्हा बोलून मी लोकांचा वेळ घेणार नाही. कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. तुमचं मन दुखावल असेल तरी खालच्या पातळीवर राजकारण करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करावं,' असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.
संपादन - अक्षय शितोळे