पुणे, 1 जानेवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केलं आहे. 'महाराष्ट्र शौर्याची भूमी आहे. विजयस्तंभ विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला दिला जाईल. मागील सरकारने जो निधी मंजूर केला होता तो अजून आला नाही. मात्र एकमेकांवर ढकलून चालणार नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी विजयस्तंभ विकासाबाबत भाष्य केलं आहे.
'कोरोनाचे संकट असल्यामुळे घरातूनच जयस्तंभाला अभिवादन करावं. अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र व्यवस्थित बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी सर्वांनी कोरोना काळात सुरक्षितता बाळगणं महत्वाचं आहे,' अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी केल्या.
सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी मिळावी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना नक्की काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. "मावळतं वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेलं, येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2021 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार नववर्षानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळत्या 2020 वर्षानं आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. त्या गोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरुवात करुया. कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्यानं मास्क लावणं, गर्दी टाळणं, हात वारंवार धुत रहाणं या त्रिसूत्रीचं पालन करुया. कोरोनापासून स्व:ताचं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करीत दैनंदिन व्यवहार हळुहळु काळजीपूर्वक सुरु करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. येणारं नवीन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करुन देणारं, राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.