एकनाथ खडसेंच्या 'त्या' भेटीबद्दल अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले...

एकनाथ खडसेंच्या 'त्या' भेटीबद्दल अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले...

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

  • Share this:

पुणे, 16 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा जवळपास निश्चित मानला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे.

आज अजित पवार यांनी पुण्यात कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. भाजपचे नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे, तुमचीही आधी भेट झाली होती, असा सवाल विचारला असता अजित पवारांनी आपल्या स्टाइलने उत्तर दिले.

'राजकीय जीवनात वावरत असताना अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. अनेक जण कामानिमित्ताने भेटत असतात. त्याच दरम्यान, त्यांची आणि माझी भेट झाली होती. आता आमची भेट झाली म्हणून त्यातून कोणताही अर्थ काढू नये. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत की, याबद्दल माझ्याकडे माहिती नाही', अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

तसंच, 'जलयुक्त शिवार योजनेची चौकशी कॅगच्या अहवालानुसारच करण्यात येत आहे. राज्य सरकारने  सुडबुद्धीने कारवाई केली नाही. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये. सरकार कुणाचेही असताना चुका होऊ शकतात, असंही अजित पवार म्हणाले.

त्याचबरोबर, 'कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहे.

तसंच, 'केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही  राज्यव्यापी मोहिम हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवावा' असे निर्देशही अजित पवारांनी दिले.

एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाही - पंकजा मुंडे

दरम्यान, एकनाथ खडसे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.  या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘न्यूज18 लोकमत’शी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

'एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत, याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, असं पंकजा यांनी सांगितले.

Published by: sachin Salve
First published: October 16, 2020, 4:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या