मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, शरद पवारांचा वारकरी परिषदेला टोला

मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, शरद पवारांचा वारकरी परिषदेला टोला

पंढरपूरला मी नेहमी जात असतो. मात्र, त्याची प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो. मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला टोला लगावला आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड,8 फेब्रुवारी: पंढरपूरला मी नेहमी जात असतो. मात्र, त्याची प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो. मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला टोला लगावला आहे. एवढेच नाही तर मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन, माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, असा सज्जड इशाराही शरद पवारांनी दिला आहे.

जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार शनिवारी आळंदीत आले होते. पवार म्हणाले, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचे असते. माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचे असते. तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचे असते, पण यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचे विचारच समजले नाही, असाही घणाघाती टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला. सच्चा वारकरी अशी भूमिका कधीच घेणार नाही. म्हणून त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपला मार्ग सोडायचा नसतो. बांधिलकी सोडायची नसते, तिथे तडजोड करायची नसते. त्याच भावनेने इथे आल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.

कोण हभप? मला माहीत नाही..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला. ते देवाला मानत नाहीत. त्यामुळे शरद पवारांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी परिषदेवर निशाणा साधला आहे.

हभप कोण आहे. हे मला माहीत नाही. वारकऱ्यांचे नेते असतात, हे मला माहीत नाही. कर्मकांडाला खुले आव्हान देणारी वारकरी सांप्रदाय होता. आता हे कोण आले आहेत. जात व्यवस्था तोडण्यासाठी ही वारकरी चळवळ आहेय. वारकरी हिंदू असला पाहिजे हे कोणी सांगितलं. सर्व जाती धर्माचे संत का निर्माण झाले, याचा आपला अभ्यास करायला पाहिजे. अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी परिषदेवर टीका केली आहे.

हे काय शंकाराचार्य आहेत का?

शरद पवारांनी तिथं येऊ नका, हे सांगणारे कोण? हे काय शंकाराचार्य आहेत काय? त्यांचं हिंदुत्व हे हिंदुत्व आहे का? ते आम्हाला सर्टिफिकेट देणार काय? पवारांना सांगणारे हे कोण आहेत. विठ्ठलाचा मुस्लिम ही वारकरी होता.

..तर शरद पवारांना कार्यक्रमांना कशासाठी बोलवता?

'राष्ट्रवादीचे क्राँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देव, धर्म मानत नाही. त्यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी धार्मिक कार्यक्रमांना व्याख्यानाला कशासाठी बोलवता? फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी अशा लोकांना कार्यक्रमांना बोलवू नका,' असे आवाहन निवृत्ती महाराज वक्ते यांनी पत्रकाद्वारे केले आहे. वक्ते महाराज हे राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक आहेत.

'ज्यांना हिंदू धर्माबद्दल आदर आहे व ज्यांना धर्मासाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे अशा हिंदू धर्माभिमानी राज्यकर्त्यांनाच धार्मिक कार्यासाठी बोलवावे. शरद पवार मुख्यमंत्री असताना महापुजेसाठी गैरहजर राहिले होते. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ कधीच गेले नाहीत, संत ज्ञानेश्वरांनी संजिवनी समाधी घेतली नाही असे मत मांडणारे तथाकथित पुरोगामी लेखकांना पवारांचा पाठिंबा असतो. अशा लोकांना सद्गुरू जोग महाराज शताब्दी महोत्सवाला बोलवण्यापेक्षा खऱ्या धर्माभिमानी हिंदू पुरस्कर्ते राजकीय व्यक्तीला आमंत्रित करावे,' असे आवाहन निवृत्ती महाराज वक्ते यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केले आहे.

वारकरी संप्रदायातील हभप वा.ना महाराज उत्पात यांनीही शरद पवारांना रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला होता. वारकरी संप्रदायातील जेष्ठ महाराजांनी थेट शरद पवारांना स्पष्ट विरोध केल्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

First published: February 8, 2020, 2:03 PM IST

ताज्या बातम्या