पुण्यात मुस्लीम बांधवांनी ठेवला नवा आदर्श, रमजान ईदच्या दिवशीही कोरोनाग्रस्तावर केले अंत्यसंस्कार

पुण्यात मुस्लीम बांधवांनी ठेवला नवा आदर्श, रमजान ईदच्या दिवशीही कोरोनाग्रस्तावर केले अंत्यसंस्कार

पुण्यातील कोरोनाची साथ सुरू झाल्यापासूनम् हणजेच तब्बल 14 महिन्यांपासून मूलनिवासी मुस्लीम मंचचे कार्यकर्ते विना मोबदला कोरोना ग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

  • Share this:

पुणे, 14 मे : आज खरंतर मुस्लीम बांधवांचा रमजान ईद हा पवित्र सण. रमजान महिन्याच्या या शेवटच्या दिवशीच तमाम मुस्लीम बांधव महिन्याभराचे रोजाचे उपवास सोडून ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात. या सणाच्या दिवशी देखील पुण्यातील मुस्लिम बांधवांनी लिंगायत समाजातील कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करून सर्व धर्म समभावाचा एक आगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

पुण्यातील कोरोनाची साथ सुरू झाल्यापासूनम् हणजेच तब्बल 14 महिन्यांपासून मूलनिवासी मुस्लीम मंचचे कार्यकर्ते विना मोबदला कोरोना ग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. विशेष म्हणजे या 18 जणांनी आत्तापर्यंत विविध जाती धर्मातील तब्बल 1300 कोरोना ग्रस्तांवर त्यांच्या त्यांच्या धार्मिक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केलेत आणि तरीही त्यांच्यापैकी अद्याप एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही. मानवधर्माची सेवा म्हणूनच आम्ही हे काम करत असून यापुढेही कोरोना संपेपर्यंत विनामोबदला हे कार्य करतच राहणार असल्याचं अंजूम इनामदार यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे गेला महिनाभर या मुस्लीम बांधवांनी रोजाचे कडक उपवास धरलेत. पण या कोरोना अंत्यसंस्काराच्या कामात त्यांनी कुठेही खंड पडू दिलेला नाही. गेल्यावर्षी मार्च महिन्यात पुण्यात कोरोना या आजाराने प्रथम मृत्यू झाल्यानंतर कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला कोणीच पुढे येत नव्हतं.

हे ही वाचा-कोरोनाचा कहर! एका मुलाला मुखाग्नी देऊन घरी परतला बाप, दुसरा मृतावस्थेत आढळला

अगदी चांगल्या सुशिक्षित घरातले लोक देखील आपल्या आप्तेष्ठांच्या मृत देह ताब्यात घ्यायला पुढे येत नव्हते. त्यामुळे कोरोना संसर्गित मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यासाठी पुण्यातील मूल निवासी मुस्लीम मंच ही संस्था पुढे आली. याकामी पालिका त्यांना फक्त पीपीई किट आणि अंत्य संस्काराचं साहित्य पुरवते. गेली चौदा महिने विना मोबदला सुरू असलेली ही आजही सुरू आहे. आजही घरात रमजान सणाची धामधूम सुरू असतानाही येरवडा लिंगायत दफनभूमी येथे लिंगायत समाज बांधवाच्या मृत्यूनंतर दफनविधी पार पाडला नंतरच ईदचा सण साजरा केला. अंजून इनामदार यांच्या मूल निवासी मुस्लीम घटनेतील सलीम शेख, आसिफ शेख, इम्तियाज पटेल, अजलान मणियार यांच्यासह 18 कार्यकर्ते हे पवित्र कार्य करीत आहेत. मध्यतंरी एका राजकीय पक्षाने त्यांच्या या सेवेला धर्माचं कारण पुढे करत विरोध करूनही पाहिला पण अंजून इनामदार यांनी आपली ही सेवा सुरूच ठेवली.

अंत्यस्काराच्या वेळी काही नातेवाईक व्हिडिओ कॉल करून अंत्यविधी पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यावेळी हे कार्यकर्ते आपल्या मोबाईलवरून नातेवाईकांची ही मागणी देखील पू्र्ण करतात एवढंच नाहीतर हिंदू धर्मातील अंत्यविधी असेल तर अस्थी मिळवून देण्यासाठीही मदत करतात. म्हणूनच पुण्यात कुठेही कोरोना मृत्यू झाला की लोक मोठ्या विश्वासाने मूल निवासी मंचच्या कार्यकर्त्यांना पाचारण करतात.

Published by: Meenal Gangurde
First published: May 14, 2021, 10:23 PM IST

ताज्या बातम्या