सुमीत सोनवणे, (प्रतिनिधी)
दौंड, 15 मे: शेतीच्या वादातून दौंड तालुक्यातील उंडवडी येथील भोसलेवाडीत पुतण्याने चुलत्यासह दोन चुलत भावांवर धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चुलत्याचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
भोसलेवाडी येथे शुक्रवारी जमिनीच्या बांधावरुन झालेल्या वादातून ही रक्तरंजित घटना घडली. गारुडी कुंटुबीयांची शेती असून पोपट व बापू गारुडी हे दोघे भाऊ आहेत. यातील पोपट गारुडी यांचा मुलगा अमित याने बापू गारुडी आणि त्यांच्या दोन मुलांना अगोदर अल्टो कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा.. 35 दिवसांच्या चिमुरड्यानं कोरोनाला हरवलं, एका दिवसात 51 रुग्ण झाले ठणठणीत
त्यानंतर कोयत्याने चुलते बापू लक्ष्मण गारुडी व त्यांच्या दोन्ही मुलांवर जीवघेणा हल्ला केला. यात बापू गारुडी यांचा जागेवरच मृत्यू झाला. बापू गारूडी यांचा मृतदेह यवत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दुसरीकडे, आरोपी अमित पोपट गारुडी हा स्वत:हून यवत पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने चुलत्याच्या खूनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा, यवतचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यवत पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान ऐश्वर्या शर्मा यांनी नागरिकांना कोरोनासारख्या संकटाच्या काळात पूर्ववैमनस्य बाजूला ठेवून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, एका जन्मदात्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केला आहे. वडवणी (जि.बीड) येथे ही घटना घडली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमृता गणेश शिंदे असं मृत मुलीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी बाप गणेश शिंदे याला अटक केली आहे.
हेही वाचा.. कोरोनामुळे साखर उद्योग मोठ्या संकटात, शरद पवारांनी मोदी सरकारला सुचवले 5 उपाय
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोटच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. चौकशीतून डोकं सुन्न करणारी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, अमृता ही सतत आजारी पडते म्हणून तिची गळा दाबून हत्या केल्याचं नराधम बापानं कबूल केलं आहे. आरोपी हा फुल विक्रेता आहे.
दरम्यान, अमृता दोन दिवसांपासून बेपत्ता होती. कुटुंबाने आसपासच्या परिसरात शोधाशोध केली. मात्र, मुलगी मिळून आली नाही. दरम्यान मंगळवारी मुलीचा मृतदेह गावाशेजारील वाड्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेह मिळाल्यानंतर अमृताच्या वडिलांच्या चेहऱ्यावर कसलेच दुःख दिसून आले नाही. याबाबत त्याची कसून चौकशी केली असता मुलीचा खून त्याने केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.