'डॉ. केतन तुम्ही अशा प्रकारे जायला नको होतं!' E Way वरच्या भीषण अपघातानंतर सुहृदाची खंत

पुण्यातले निष्णात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचं पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या विचित्र अपघातात निधन झालं. त्यांच्या व्यवसायबंधू आणि सुहृदाने लिहिलेलं हे भावुक टिपण

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2019 10:03 PM IST

'डॉ. केतन तुम्ही अशा प्रकारे जायला नको होतं!'  E Way वरच्या भीषण अपघातानंतर सुहृदाची खंत

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर  सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. कॉन्फरन्स संपवून पुण्याला परत येताना त्यांनी ओला बुक केली. ती स्विफ्ट कार रस्त्यात बंद पडली. मागून जोरात येणाऱ्या लक्झरी बसने त्या गाडीला धडक दिल्यानं डॉ. केतन खुर्जेकर आणि चालक दोघांचा जागीच मृत्यू झाला.

 --------------------------------------------------------------------------------------

डॉ. अमोल अन्नदाते

काल रात्री 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वर डॉ. केतन खुर्जेकर, पुण्यातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पाईन सर्जन यांचं अपघातामध्ये  निधन झालं. त्यांच्या जाण्याच्या काही तासांत त्यांचा वाढदिवस उजाडणार होता.  खरं तर अशा घटनेवर व्यक्त होतांना अश्रू तर आटतातच आणि शब्दही पांगळे होतात. डॉ. केतन हे पुण्याच्या प्रसिद्ध संचेती हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख होते व मणक्यांच्या शस्त्रक्रियेत पारंगत होते. त्या पलीकडे ते कोणाचे तरी पुत्र, पती, वडील होते.

Loading...

मानेच्या व पाठीच्या मणक्यांच्या जन्मजात व्याधी (deformities) सरळ करण्यात त्यांचा विशेष हातखंड होता. ही शस्त्रक्रिया करत असतांना एखाद्या हार्मोनियम वर संगीतकाराची बोटे सहज रेंगाळावी आणि त्यातून साक्षात दैवी गांधार रूप सहज बाहेर पडावं तसंच ऑपरेशन थिएटरमध्ये डॉ. केतन यांची बोटं मणक्यांवर फिरायची आणि जादू केल्याप्रमाणे ऑपरेशन थिएटर मधून  मणक्याचा रुग्ण बाहेर यायचा. शा अनेक रुग्णांना डॉ. केतन यांनी शब्दशः ताठ मानेने आणि ताठ कण्याने जगण्याचे वरदान दिले.

संबंधित बातमी - पुण्यात खासगी बस-कारचा अपघात, संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरसह दोघांचा जागीच मृत्यू

साक्षात देवानेच दिलेल्या मणक्याच्या व्याधींशी डॉ. केतन अविरत दोन हात करत राहिले. पण त्यांचा मृत्यू अशा प्रकारे होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही आणि 'नियतीचा न्याय' या शब्दांवरून विश्वास उडून जातो. मुंबईत होणाऱ्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेच्या Conference वरून परतत असतांना डॉ. केतन यांचा वैयक्तिक ड्रायव्हर नसल्याने त्यांनी OLA कॅब घेतली.

आपल्या दोन साथीदारांसह OLA कॅब ने प्रवास करणं पसंत केलं. रस्त्यात गाडीचं टायर पंक्चर झाल्याने ड्रायवरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. नेहमी प्रमाणे मदतीला धावून जाणारे डॉ. केतनही driver च्या मदतीला गाडीतून खाली उतरले. मागून येणाऱ्या भरधाव luxury बसने या दोघांना काळ बनून स्वतःच्या पोटात ओढून घेतले!! आता हे सगळं ऐकल्यावर स्वतःच्या गाडीने प्रवास करा, स्वतःचा ड्रायव्हर वापरा, एक्स्प्रेस वे वर मध्ये थांबू नका, थांबले तरी गाडीतून खाली उतरू नका, एक्स्प्रेस वे वर  रात्री प्रवास करू नका या सूचनांना तसा काहीच अर्थ वाटत नाही. कारण डॉ. केतन ज्याप्रमाणे मणक्यांचे भवितव्य बदलून टाकायचे तसं काळाने केलेलं हे ऑपरेशन बदलणे आपल्या कोणाच्याच हातात नाही.

हे वाचा - Mumbai Pune Expresswayवर प्रवास करणार असाल तर हे कायम लक्षात ठेवा!

डॉ. केतन यांच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबाचे क्षणार्धात सगळेच हरपून गेले पण त्यासोबत या राज्याचं आणि देशाचं न भरून येणारे नुकसान झाले.  खरंतर एक निष्णात डॉक्टर काळाच्या पडद्या आड जातो तेव्हा केवढ मोठी पोकळी निर्माण होते,  हे रोज अनेक रुग्ण बरे करणाऱ्या डॉक्टरलाच आणी गंभीर आजारातुन बऱ्या झालेल्या रुग्णालाच समजू शकते. एखादा व्यक्ती डॉक्टर म्हणून नियती जेव्हा जन्माला घालते, तेव्हा त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी देऊन पाठवत असते. जे असाधारण कौशल्य डॉ. केतन यांच्या हाती होते. त्यावरून डॉ. केतन यांच्या वरही अजून खूप काही करण्याच अनेकांच आयुष्य बदलून टाकण्याची किमया साधण्याची जबाबदारी होती. वयाच्या, यशाच्या, पैश्याच्या एका टप्प्यानंतर डॉक्टर हा या पलीकडे जाऊन फक्त काम करण्यासाठी, त्याच्या कौशल्यासाठी जगत असतो. ते कौशल्यच त्याच्या जगण्याचे साध्य आणि साधन असते. डॉ केतनच्या जाण्याने एक दैवी साध्य आणि साधनच संपले. गेलेल्या डॉक्टरला तोफांची सलामी किंवा कुठलाही शासकीय इतमामाचा प्रोटोकॉल नसतो. पण डॉ. केतन खुर्जेकर तुम्ही बरे केलेले हजारो मणके आज तुमच्यासाठी अश्रू ढाळत आहेत, सलामी देत आहेत, मानवंदना देत आहेत ...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 10:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...