पुणे, 29 जुलै : पुण्यातील एका नागरिकाला सायबर फ्रॉडमधून (Cyber Fraud) गेलेले 3 लाख 57 हजार (3.57 Lakh) रुपये परत मिळाले आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) तत्परतेमुळे हे पैसे परत मिळाले असून वेळेत तक्रार करणं आणि पोलिसांनी वेळेत कारवाई करणं, या दोन्ही गोष्टी शक्य झाल्या, तर सायबर फ्रॉडमुळे गेलेले पैसे परत मिळू शकतात, हेदेखील यातून सिद्ध झालं.
काय होतं प्रकरण?
काही दिवसांपूर्वी तक्रारदाराला एक फोन आला. जुनं क्रेटिड कार्ड बंद करून नवं घेतलं, तर रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील, असं त्यांना सांगण्यात आलं. ही ऑफर चांगली वाटल्याने त्या व्यक्तीनं एसबीआयचं क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला. हे कार्ड बंद करण्यासाठी ऑनलाईन लुटारूने त्याला कार्डचे तपशील मागितले. या व्यक्तीने ते तपशील दिल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या बँक अकाऊंटवरून 3 लाख 66 हजार रुपये गायब झाले. 14 जुलैला ही घटना घडल्यानंतर तातडीने या व्यक्तीने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली.
असे मिळाले पैसे परत
ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं एसबीआयच्या केंद्रीय कार्यालयाला संपर्क साधत आलेल्या तक्रारीची माहिती दिली. संबंधित व्यवहार हा फ्रॉड असल्याचं सांगत अधिकाऱ्यांना त्याविषय़ी माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हा व्यवहार रद्द केला आणि ज्या खात्यात हे पैसे जमा झाले होते, त्या खात्यातून वळते करून पुन्हा फिर्यादीच्या खात्यात जमा केले.
हे वाचा -राज कुंद्राच्या सासूबाईंची पोलीस स्टेशनमध्ये धाव, हे आहे त्यामागचं कारण
पोलिसांनी केलं आवाहन
अनेकदा आवाहन करूनही नागरिक आपल्या बँक खात्याविषयीची महत्त्वाची माहिती ऑनलाईन चोरांना देत असतात. नागरिकांनी सतर्कता बाळगणं आणि कुठलेही तपशील फोनवरून न देणं ही खबरदारी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Pune