पुणे, 25 नोव्हेंबर : भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात या व्हायरसचा वेगाने प्रादुर्भाव झाला. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत पुण्याचं नाव वरच्या क्रमांकावर होतं. मात्र नंतरच्या काळात शासन आणि प्रशासनाच्या मेहनतीच्या जोरदारवर या परिसरातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात यश आलं. मात्र आता पुन्हा एकदा पुणे शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला आहे.
पुणे जिल्ह्यातील दैनंदिन रूग्णवाढीने पुन्हा 1 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही रूग्ण वाढू लागले आहेत. दिवाळी सणानिमित्त अनेक नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले होते. तसंच रस्त्यावर आणि बाजारातही खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली.
या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता पुणे परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नागरिकांसह प्रशासनासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा अवलंब केला जातो का, हे पाहावं लागेल.
शहरात आज कशी राहिली परिस्थिती?
पुणे शहर आणि ग्रामीण भागात मिळून कोरोना रुग्णांची संख्या आज 1 हजाराहून अधिक आढळली आहे. यामध्ये शहरात दिवसभरात 426 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र पुणे शहरात आज कोरोनाबाधीत 9 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात 409 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 247 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 68 हजार 30 इतकी झाली आहे. तर पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 5271 इतकी आहे.
कोरोनारुग्णांची वाढत्या संख्या रोखण्यासाठी पुणे प्रशासनाकडून पुन्हा एकदा कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.