पुणे, 09 मार्च : शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ करत खळबळ उडवून दिली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी संजय राऊत यांनी नक्कल करत खिल्ली उडवली आणि राजकारणामध्ये येणारी पिढी काय शिकणार? असा थेट सवालच विचारला.
पुण्यात मनसेचा (mns) वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी राज ठाकरे यांची तोफ चौफेर धडाडली. संजय राऊत यांच्या शिवीगाळ प्रकरणाचा राज यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.
'ते संजय राऊत, तो क्या हुआ, एक बात ऐसी है. ये करते है' असं म्हणत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल काढली. टीव्ही सुरू झाला की, हे सुरू झाले. कॅमेरा बंद झाला की, हे लगेच नीट झाले' असा सणसणीत टोला राज यांनी राऊतांना लगावला.
'काय प्रकारचे आरोप करत आहे. टीव्हीवर काय बोलतात, शिव्या काय देताय. राजकारणामध्ये येणाऱ्या पिढ्या काय करणार आहे काय पाहत असतील. राज्याच्या राजकारणात हे सुरू आहे. मग जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीला काय होईल. आपल्या तोंडाला येईल ते बोलत आहे. पुढे भविष्यात काय होईल, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.
'मी काही जास्त बोलणार नाही. आज फक्त टिझर आहे. 2 एप्रिलला शिवतीर्थावर पिक्चर पाहण्यास मिळणार आहे. सत्ताधारी म्हणाले आम्हाला संपवायला निघाले, विरोधक म्हणाले सत्ताधारी आम्हाला संपवायला निघाले. मग उरलं कोण, उरलो आपण. मी अशी गोष्ट कधी पाहिली नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
'कुणी महिलांबद्दल बोलत नाही, विद्यार्थी घरी आहे, त्याबद्दल कुणी बोलत नाही. त्यांच्या भविष्याबद्दल बोलत नाही. एसटी बस सुरू होणार आहे की नाही, याबद्दल या लोकांना काहीही पडले नाही' अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
'जी लोकं आपल्याला मतदान करतात ना त्यांचे आभार माना. संपर्क कार्यालय उघडून बसले आहात. कोण विचारतं तुला असं काय आहे तुझ्याकडे. एकटाच बसलेला असतो. कार्यालय हे आहे की लोकं तुमच्याकडे काम घेऊन येतात, ते तुमचे कार्यालय आहे. महाराष्ट्रातून लोकं आपल्याकडे येतात, सरकारकडे जात नाही. त्यामुळे तो आपला पक्ष आहे. लोकं ज्या विश्वासाने आपल्याकडे येतात ना 16 वर्षांतली ही कमाई आहे. तुम्ही कोरोनाच्या काळात जे काम केले, त्यासाठी आभार हा एवढाच हा शब्द आहे' असंही राज ठाकरे म्हणाले.
मध्यतंरी अनेक कार्यकर्ता यांच्या घरी जेवायला गेलो. यापुढेही येणार पण जात बघून नाही. येत्या 21 मार्च रोजी छत्रपतींची तिथीनुसार जयंती ऊत्साहात साजरी करा. तारखेनं करा की तिथी ने करा, मी तर म्हणतो, रोज करावी. आम्ही तिथीने का करतो तर आपले सण आपण तिथीनुसार साजरे करतो म्हणूनच आपल्या राजाची जयंती ही सणाप्रमाणे साजरी करा, असंही राज ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.