पुणे, 5 डिसेंबर : मनसेचे नेते वसंत मोरे हे मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत, त्यातच आता अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षात यायची ऑफर दिली. अजित पवारांच्या या ऑफरवर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या या ऑफरनंतर वसंत मोरेंची खदखद बाहेर आली आहे. वसंत मोरे यांनी पुण्यातले मनसेचे नेते बाबू वागसकर यांचं थेट नाव घेतलं आहे.
'मला डावलण्यामागे पक्षाचे नेते आहेत पुण्यातले, त्यांची नावं सगळ्यांना माहिती आहेत. पुणे शहरात एकच नेता आहे. बाबू वागसकर दुसरं कोण. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपमध्ये जायचा माझा विचार नाही. साहेबांना बघून मी पक्षात आहे. या लोकांनी मला ढकलत ढकलत चालवलं आहे सगळं,' अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली.
'अजितदादांची ऑफर हा माझ्या कामाचा गौरव आहे. माझा पक्ष बदलण्याचा विचार नाही. मी पक्षनेतृत्वावरही नाराज नाही. स्थानिक नेते मला काही करू देत नाही. मला डावललं जातंय, भाषण करू दिलं जात नाही. राज ठाकरे दखल घेत नाहीत, याची मला खंत आहे,' असं वसंत मोरे म्हणाले.
तात्या मी वाट पाहतोय, अजित पवारांची मनसेच्या मोठ्या नेत्याला ऑफर
'चंद्रकातदादा पण मला बोलवता ना, मनसेचे तात्या इकडे या, असे बोलले. माझ्यावर शिक्का पडला आहे. माझ्याच नेत्यांना मला एकटं पाडायचे आहे. त्यांना बहुतेक माझी प्रसिद्धी खुपतेय. मी पक्ष सोडणार नाही, पण वेदना होतात. बाकी पक्ष माझ्या कामाची दखल घेतात. पण माझेच सहकारी मला पक्षाबाहेर ढकलू पाहताहेत हे खूप वेदनादायी आहे', अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली.
काय झाला वाद?
गेल्या आठवड्यात मनसेचा शहर पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनसे नेते वसंत मोरे यांची देखील उपस्थिती होती. मात्र, शहर पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित असूनही मेळाव्यात त्यांना बोलण्याची संधी न दिल्यानं ते नाराज झाले आहेत. कोअर कमिटीत असूनही भाषणाची संधी मिळत नसेल तर ही कोअर कमिटी आमची फक्त ठासायला आहे का ? असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी विचारला. यानंतर आता वसंत मोरे यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये यायची ऑफर दिली. याआधी राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे बंद झाले नाहीत तर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यावरही वसंत मोरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, MNS, Raj Thackeray