राज म्हणाले, आज बाळासाहेब हवे होते.. राम मंदिरासोबत रामराज्यही आणा!

राज म्हणाले, आज बाळासाहेब हवे होते.. राम मंदिरासोबत रामराज्यही आणा!

ज्या देशात नोकऱ्या जातायेत, इतर काही गोष्टी घडत आहेत, ते संपवण्यासाठी रामराज्य आणावे.

  • Share this:

पुणे,9 नोव्हेंबर: शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या वादावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. एवढ्या वर्षांची प्रतीक्षा आज संपली, असे म्हणायला हरकत नाही. या संपूर्ण आंदोलनात, संघर्षात ज्या कारसेवकांनी बलिदान दिले, ते कुठेतरी सार्थकी लागले. राम मंदिर लवकरात लवकर बांधावे. त्याशिवाय देशात रामराज्यही आणावे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. सोबतच इतका धाडसी निर्णय घेतल्याबाबत राज यांनी सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानले आहेत.

आज बाळासाहेब हवे होते..

राज ठाकरे म्हणाले, आजच्या निकालानंतर मला मनापासून काही वाटत असेल तर, आज बाळासाहेब असायला हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हवे होते, त्यांना खूप आनंद झाला असता. ज्या देशात नोकऱ्या जातायेत, इतर काही गोष्टी घडत आहेत, ते संपवण्यासाठी रामराज्य आणावे.

दरम्यान, राज ठाकरे शनिवारी पुण्यात आहेत. राज ठाकरे यांनी मराठीत प्रतिक्रिया दिल्यानंतर, हिंदी मीडियाने राज ठाकरेंना हिंदीत प्रतिक्रिया देण्याची विनंती केली. मात्र, राज यांनी टोमणे मारत, माझे हिंदी एवढे चांगले नाही, असे म्हटले. शिवाय मी विचार करतो, आणि बोलतो असेही ते म्हणाले.

वादग्रस्त जागेवर राम मंदिरच होईल...

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिरच होईल तर मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचा निकाल दिला. आतील भाग अद्यापही वादग्रस्त असून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच इतरत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

Published by: Sandip Parolekar
First published: November 9, 2019, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading