पाण्यासाठी काय पण, पुण्यात मनसे महिला शहराध्यक्षाचे 'शोले स्टाईल' आंदोलन

पाण्यासाठी काय पण, पुण्यात मनसे महिला शहराध्यक्षाचे 'शोले स्टाईल' आंदोलन

आश्विनी बांगर यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड,13 डिसेंबर: पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून शहरात एक दिवसा आड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याविरोधात मनसेच्या महिला शहराध्यक्ष आश्विनी बांगर यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता 'ब' प्रभाग येथील पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत शोले स्टाईल आंदोलन केले.

आश्विनी बांगर यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आश्विनी बांगर यांनी महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करत तब्बल दीड तास हे आंदोलन केले. यंदा पुणे जिल्ह्यासह राज्यभरात दमदार पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 92 टक्के जलसाठा आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणी कपात का, असा सवाल देखील आश्विनी बांगर यांनी उपस्थित केला आहे.

आश्विनी बांगर यांच्या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. महापालिका प्रशासनाने घेतलेल्या पाणी कपातीचा निर्णय टँकर माफियांच्या फायद्याचा आहे. कमी पाणी मिळत असल्याने शहरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासन निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत टाकीवरून खाली न उतरण्याचा पवित्रा आश्विनी बांगर यांनी घेतला होता. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मोठी कसरत केल्यानंतर आश्विनी बांगर यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरवण्यात आले आहे. पोलिसांनी आश्विनी बांगर यांना ताब्यात घेतल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या