सुमित सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 10 जानेवारी : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) यवत हद्दीमध्ये कंटेनर आणि मिनी ट्रॅव्हल्स बसमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हलचालक जागीच ठार झाला आहे तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मिनी ट्रॅव्हल्स चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि थेट डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, यात मिनी ट्रॅव्हल्सचा चुराडा झाला. तर कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.
या मिनी ट्रॅव्हल्स बसमध्ये दोघे जणच असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या अपघातात मिनी ट्रॅव्हल्स चालकाचा मृत्यू झाला आहे. मिनी ट्रॅव्हल्समधील जखमी किन्ररला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रुग्णालयात नेत असताना वाटेतच ड्रायव्हरचा मृत्यू झाला.
धडक दिलेल्या कंटेनरमध्ये लोखंडी अँगल होते. अपघातानंतर महामार्गावर लोखंडी अँगल पडले होते. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेन आणि कामगारांच्या मदतीने लोखंडी अँगल जमा करण्यात आले. त्यानंतर वाहतूक ही पूर्ववत करण्यात आली.