प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 26 मे : गतिमंद मुलं वाढवणं ही खरंतर तारेवरची कसरत असते. या मुलांना वाढवताना समाजाच्या काहीशा उत्सुक आणि सहानुभूतिपूर्ण, तर क्वचित उपहासात्मक नजरांचा सामना करताना त्यांच्या पालकांची होणारी ओढाताण तर शब्दांत देखील सांगता येणार नाही. पण याच मानसिक आजाराशी लढणार्या रुग्णांनी स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू केला आहे. तुम्ही ऐकून थोडं चकित व्हाल पण हे खरं आहे.
पुण्यातील शिवाजीनगर मनपा कार्यालयाच्या बाजूला या गतिमंद रुग्णांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करत 'किमया' नावाचा कॅफे सुरू केला आहे. कॅफेमध्ये मानसिक आजारातून बरे होणारे सात गतिमंद रुग्ण अगदी सुलभतेने गेले एक ते दीड वर्षे काम करत आहेत. कॅफेमध्ये हे मानस मित्र ग्राहकांशी संवाद साधतात. विविध पदार्थ बनवतात त्याचबरोबर पैशांचा हिशोबदेखील ठेवतात. कॅफेमध्ये कोल्ड ड्रिंक, कॉफी, चहा, बिस्किट, वडापाव, समोसा, कचोरी असे पदार्थ उपलब्ध आहेत.
कशी सुरुवात झाली कॅफेची?
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शैलाताई दाभोलकर यांच्या 'परिवर्तन' संस्थेमार्फत 'किमया' कॅफेचा हा संकल्प उभा केला आहे आणि गतिमंद रुग्णांना आधार दिला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये हे गतिमंद रुग्ण लोकांसोबत संवाद साधताना पाहून डॉ. हमीद दाभोलकर यांना जाणवले की त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करता येऊ शकते आणि यातूनच 'किमया' कॅफेची संकल्पना उभी राहिली. या कॅफेची सुरुवात झाली तेव्हा ते चालवणाऱ्या गतिमंद रुग्णांना कॅफेमध्ये वस्तू आणणे, ग्राहकांशी संवाद साधणे, पैशांचे व्यवहार या गोष्टी अवघड गेल्या परंतु पुढे शिकत शिकत त्यांना त्या जमू लागल्या.
अशा हस्तकलेच्या वस्तू कधी पाहिल्या नसतील, उत्तर प्रदेशचं आहे कनेक्शन, पुण्यात कुठे? VIDEO
'परिवर्तन' संस्थेने केले रुग्णांचे 'परिवर्तन'
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शैलाताई दाभोलकर यांनी 2007 मध्ये सुरू केलेली परिवर्तन संस्था सातारा, पुणे, आसाम, अरुणाचल अशा प्रदेशांत कार्यरत आहे. 'परिवर्तन' संस्था मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनतेवर काम करते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर संस्थेचे काम पाहतात. तीव्र मानसिक आजाराशी झगडत असणार्या रुग्णांवर संस्थेमार्फत उपचार केले जातात. काही विशिष्ट प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज संस्थेमार्फत घेतल्या जातात.
रुग्णांना नोकरीच्या संधी
'मानस रंग' या आर्ट थेरपीच्या सहाय्याने रुग्णांवर लवकर उपचार होतो. बऱ्या झालेल्या रुग्णांना नोकरीच्या संधी संस्थेमार्फत दिल्या जातात. पुण्यात वेगवेगळ्या भागात मानस मित्रमैत्रिणी काम करत आहेत, अशी माहिती 'परिवर्तन'च्या समुपदेशिका रेश्मा कचरे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.