अनिस शेख, मावळ, 8 एप्रिल: मावळ तालुक्यातील (Maval Taluka) देहूरोड येथील संत तुकाराम रुग्णालयात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सध्या या रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या 25 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनासोबत झालेल्या वादानंतर एका 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या नातेवाईकांनी थेट या महिलेला आपल्यासोबत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
उपचारादरम्यान सदर महिलेला रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने नातेवाईकांनी इंजेक्शनची पूर्तता करावी, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाकडून नातेवाईकांना करण्यात आली. त्यानुसार नातेवाईकांनी इंजेक्शनची पूर्तता करत कोरोनाबाधित महिलेला रेमडेसिव्हीर इंजेक्शन आमच्या समोर द्या, असा आग्रह धरला.
संपूर्ण हॉस्पिटल हे कोविड रुग्णालय असल्याने नातेवाईकाला हॉस्पिटलमध्ये येण्यास रुग्णालय प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. परंतु संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत डॉक्टरांना शिवीगाळ करून कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयातून सोबत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
हेही वाचा - VIDEO: 'क्वारंटाइन टाळण्यासाठी पैशाची मागणी'; मुंबईच्या हॉटेलबद्दल गायिकेने केला खळबळजनक दावा
रुग्णालय प्रशासनाकडून या घटनेबाबत तात्काळ देहूरोड पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत कोरोनाबाधित महिला तसंच तिच्या नातेवाईकाचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, एकीकडे राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्ण संख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. त्यातच नातेवाईकांनी कोरोना पॉझिटिव्ह महिलेला थेट सोबत नेल्याची घटना घडल्याने कोरोनाचा आणखी प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून सदर कोरोनाबाधित महिला आणि तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.