जुन्नर, 18 मे: पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junner) तालुक्यातील निमदरी येथील धोंडकर वाडीतल्या एका घरगुती लग्नसोहळ्याला उपस्थित राहिलेल्यात नवरदेवासह घरातील व नातेवाईक असे एकूण 23 पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळींचे कोरोना (corona positive) अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धोंडकर वाडीत खळबळ उडाली आहे. लग्न सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून याच कुटुंबातील एक वृद्ध महिला कोरोनामुळे मृत झाली आहे. यामुळे तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
लॉकडाऊन मध्ये लग्न सोहळ्याला फक्त 25 वऱ्हाडी मंडळींना परवानगी असताना धोंडकर वाडीच्या ऋषिकेश धोंडकर व आरती फोडसे यांचा 4 मे रोजी घरीच लग्न सोहळा आयोजित केला होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 5 मे ला सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने नातेवाईक व पाहुणे यांची गर्दी झाली होती.
लग्नानंतर दोन दिवसाने नवरदेव मुंबईला जाऊन आला होता. त्यानंतर नवरदेवाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या नातेवाईकांची टेस्ट करण्यात आली. लेण्याद्री येथील कोविड सेंटरला टेस्ट करण्यात आलेल्या चाळीस जणांपैकी बारा जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून खाजगी ठिकाणीसुद्धा दहापेक्षा जास्त जण पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या 23 पेक्षा जास्त वाढली आहे.
घरगुती पध्दतीने हा लग्न सोहळा झाला होता. मात्र काळजी न घेतल्याने एवढी मोठी रुग्ण संख्या वाढल्याच ग्रामस्थ बोलत आहेत.या नंतर सोमवारी(दि.१७ मे) दुपारी तातडीने निमदरी ग्रामस्थ व कोरोना समितीच्या कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक घेऊन गाव पुढील काही दिवस लॉकडाऊन घोषित केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid-19 positive, Maharashtra, Marriage, Mumbai, Wedding