पुणे 06 जानेवारी : पुण्यात सुरू असलेल्या 63व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आजचा दिवस हा उत्कंठा वाढविणारा होता. प्रत्येक क्षणाला काय होईल याची कमालीची उत्सुकता होती. ही उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सामना बरोबरीत सुटला. पण शेवटचा गुण शैलेश शेळकेनं मिळवल्याने तो विजेता ठरला. आता उद्या म्हणजे मंगळवारी महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होणार असून त्यात महाराष्ट्र केसरी निवडला जाणार आहे. या समान्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तिगीरपरिषदेचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
आज मॅटवरच्या अंतिम फेरीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने गतविजेता अभिजीत कटकेवर 4-2 गुणाच्या फरकाने मात केली तर माती गटाची अंतिम फेरी अतिशय चुरशीची झाली. दोघांना समसमान म्हणजेच 10-10 गुण मिळाले पण शेवटचा गुण लातूरच्या शैलेश शेळकेनं मिळवल्याने तो विजेता ठरला.
महाराष्ट्र केसरीसाठी त्याची लढत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरशी होणार आहे. केवळ चपळाईच्या जोरावर हे दोन्ही मल्ल अनपेक्षितपणे गतविजेत्यांना चितपट करत पहिल्यांदाच थेट अंतिम फेरीत धडकले आहेत.
त्यामुळे उद्याच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र केसरीचा किताब कोण जिंकणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालीय. विशेष म्हणजे या समारोपाला स्वत: शरद पवार मुख्यमंञी उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित राहणार असल्याने ही 'दंगल' चांगलीच रंगण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.