पुणे, 16 जुलै : बारावीच्या विद्यार्थ्यांची अखेर प्रतीक्षा संपली आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा निकाल जाहीर झाला. राज्यातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अनेकांना आपली स्वप्न गवसली. बारावीच्या परिक्षांसाठी केलेली सगळी मेहनत आज समोर आली. अशीच स्वप्न साकारली आहेत मुळच्या अमरावतीच्या दिवांशू गावणकर यानं. दिवांशू हा जन्मापासूनच दृष्टिहिन आहे. पण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आज त्याने बारावीमध्ये उत्तम असं यश मिळवलं आहे.
दिंवाशू हा शिक्षणासाठी पुण्यात असतो. बारावीच्या परिक्षांसाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. अंध असल्यामुळे इतरांसारखं कॉलेजात जाणं किंवा प्रत्येक धडा समजून घेणं त्याला शक्य नाही. त्यामुळे विविध संस्थांच्या माध्यमातून अंध मुलांसाठी काही ऑडिओ क्लिप्स तयार केल्या जातात. याचाच आधार घेत दिवांशूनं मन लावून अभ्यास केला आणि बारावीत 74 टक्के मिळवले.
आपल्या अंधपणावर मात करून मेहनत आणि जिद्द असली की काहीही मिळवणं शक्य असतं हे त्याने सिद्ध केलं आहे. ऑडिओ रेकॉर्डींग्स आणि रिलॅबसचे रेकॉर्डिंग ऐकूण त्याने बारावीचा अभ्यास केला. ब्रेन बुक्स वाचल्या. खरंतर यामध्ये त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ब्रेन बुक्स मोठ्या असल्यामुळे त्या एकाच ठिकाणी ठेवून अभ्यास करणं, सतत ऑडिओ क्लिप्स ऐकणं यावर त्याने आपली बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे.
या सगळ्यात दिवांशूला त्याच्या मित्रांनीही खूप मदत केली. त्याच्या यशामागे त्याचे आई-बाबा, शिक्षक आणि मित्रांचा मोठा खारीचा वाटा आहे. दिवांशूने खऱ्या अर्थाने त्याच्या अंधपणावर विजय मिळवला आहे असं म्हणायला हरकत नाही. 'माझ्या या कामगिरीमुळे आणि चांगल्या अभ्यासामुळे आज माझ्या आई-वडिलांचा आत्मविश्वास वाढला' असं त्याने मोठ्या अभिमानाने सांगितलं.
दिवांशूच्या या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्याचं यश पाहून तो पुढे खूप मोठा होईल अशा आशा त्याच्या कुटुंबियांकडून पल्लवीत झाल्या. दिवांशूला त्याच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज18 लोकमतकडूनही खूप खूप शुभेच्छा...
दरम्यान, बारावीचा हा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येणार आहे. कोरोनामुळे दहावी बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्यात आले होते. बारावीचा यंदाचा निकाल 90.66 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीपेक्षा 4.78 टक्क्याने निकाल चांगला लागल्याची माहिती मिळाली आहे.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.