भाजपने डावललं.. राष्ट्रवादीनं सावरलं, या नेत्यामुळे वाढली विद्यमान आमदाराची डोकेदुखी

भाजपने डावललं.. राष्ट्रवादीनं सावरलं, या नेत्यामुळे वाढली विद्यमान आमदाराची डोकेदुखी

सुनील शेळके यांनी केलेले अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन विरोधकांच्या मनात धडकी भरवणारे ठरले आहे.

  • Share this:

अनिस शेख,(प्रतिनिधी)

मावळ,4 ऑक्टोबर: मावळ तालुक्यात इच्छुकांच्या शक्ती प्रदर्शनाने निवडणूक रंगतदार ठरणार आहे. विद्यमान आमदार बाळा भेगडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुरूवारी भाजपकडून अधिकृत पणे उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून यंदा उमेदवारी मिळेल, या आशेवर शेवटपर्यंत लढा देणारे भाजपचे नेते सुनील शेळके यांना शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे विद्यमान आमदार बाळा भेगडे यांना सुनील शेळके कडवे आव्हान देणार आहे.

सुनील शेळके यांनी वडगाव येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शेळके यांनी केलेले अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन विरोधकांच्या मनात धडकी भरवणारे ठरले आहे. जवळपास 25 ते 30 हजार मतदार नागरिक व कार्यकर्ते या शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले होते. यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वडगाव बाजारपेठेत शेळके समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे, टोप्या, मफलर तसेच अनेक नेत्यांच्या जयघोषाने वडगाव शहर राष्ट्रवादीमय झाले होते. 61 ढोल लेझीम पथकाने आपले पारंपारिक खेळ सादर करत शक्तीप्रदर्शनात वेगळी रंगत आणली. अभूतपूर्व झालेल्या गर्दीमुळे इंटरनेट तसेच मोबाईल सेवा जवळपास तीन तासापर्यंत खोळंबली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे देताना पोलिसांचीही मोठी दमछाक झाली. रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे संपूर्ण तालुक्यात सुनील शेळके यांचे शक्तिप्रदर्शन विरोधकांच्या मनात धडकी भरवणारे असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, मतदार राजा कोणावर मेहरबान होणार तसेच मावळाचा भावी आमदार कोण होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे लागलेले आहे.

मावळ तालुक्यातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून जबरदस्त फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यात सुनील शेळके तसेच माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे पुतणे रविंद्र भेगडे यांचा समावेश होता. तालुक्याच्या इतिहासामध्ये तीन वेळा भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणालाही देण्यात आले नव्हती. यासाठीच माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी तसेच पक्षातील इतर जेष्ठ नेत्यांनी वरिष्ठांना मावळातून उमेदवारीसाठी नवीन चेहरा द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु पक्षश्रेष्ठींकडून मागणी मान्य न झाल्याने माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी पक्षाविरोधात बंडाचे हत्यार उपसून पुतणे रविंद्र भेगडे यांना निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उभे करण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपमधून होणारी बंडखोरी बाळा भेगडे यांच्यासाठी डोकेदुखीची ठरणार असून पक्षांतर्गत होत असलेला गटबाजीची उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे बाळा भेगडे यांच्यासमोरील आव्हान अधिक कडवे झाले आहे. भाजपने उमेदवारी डावलल्याने भाजपचे इच्छुक असलेले उमेदवार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधून रणशिंग फुंकले आहे. पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळत नसल्याची खदखद माजी आमदार दिगंबर भेगडे तसेच इच्छुक उमेदवार सुनील शेळके यांनी मांडली. मावळातून होणाऱ्या यंदाच्या तिरंगी लढतीमध्ये विजय कोणाचा होईल, याचा अंदाज बांधणे कठीण असले तरी सुनील शेळके तसेच रविंद्र भेगडे यांच्या उमेदवारीने भाजपला यंदा मावळ तालुक्यातून मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रकाश मेहतांचे समर्थक चिडले, भाजप उमेदवाराच्या बॉडीगार्डला बेदम मारहाण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या