पुण्यात भाजपमध्ये बंडखोरीची चिन्हे.. या राज्यमंत्र्यांना निवडणूक झाली अवघड?

पुण्यात भाजपमध्ये बंडखोरीची चिन्हे.. या राज्यमंत्र्यांना निवडणूक झाली अवघड?

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.

  • Share this:

अंनिस शेख,(प्रतिनिधी)

मावळ,25 सप्टेंबर:मावळ तालुक्यातून विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षातूनच बंडखोरी होण्याची मोठी चिन्हे निर्माण झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. बाळा भेगडे तसेच सुनील शेळके या दोन्ही गटांची मावळात मोठी ताकत आहे. गाव भेट दौरा.. कार्यकर्ता मेळावा.. आरोग्य शिबिर.. अशा विविध संकल्पनेच्या माध्यमातून दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

परंतु, पक्षश्रेष्ठींकडून अद्याप मावळातून भाजपचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला नसल्याने स्वपक्षातूनच भेगडेंना कडवे आव्हान उभे करणारे सुनील शेळके यांनी मात्र तिकीट मिळवण्याची आशा सोडलेली नाही. पक्षश्रेष्ठी नक्कीच न्याय देतील, या आत्मविश्वासावर शेळके यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचा धुराडा उडवून टाकला आहे.

दुसरीकडे, सुनील शेळके यांची तालुक्यातील वाढती ताकद पाहता सत्तेत राज्यमंत्री असलेले बाळा भेगडे यांनी तिकीट मिळवण्यासाठी दिल्ली दरबारी जबरदस्त फिल्डिंग लावली आहे.

उमेदवारी कोणालाही मिळो परंतु मावळातून यंदा बंडखोरी होणारच हे मात्र अधोरेखीत झाले आहे. भाजपमध्ये पडलेल्या सध्या या फुटीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांना होईल का हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

मी पुन्हा येईन.. राज्यमंत्र्यांनी वाचला विकास कामांचा पाढा!

मी पुन्हा येईन.. असे सांगत मावळचे आमदार आणि महाराष्ट्राचे पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत चक्क मागील दहा वर्षांत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला होता. वडगाव येथील पंचायत समिती कार्यालयात राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. आपल्या कार्यकाळात कोट्यवधींची विकास कामे केल्याचा दावा भेगडे यांनी यावेळी केला होता.

दरम्यान दोन महिन्यांत मतदारांनी जनकौल मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला देऊन देशाची सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देऊन 'नवभारत' निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे 'मी पुन्हा येईन' या विश्वासाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकास करणारे सरकार राज्यात पुन्हा येईल, असा विश्वासही राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मावळ तालुक्यात मी जनतेचे विश्वास संपादित केला असल्याने मी पुन्हा येईल, असे सूचक वाक्तव्य करत बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातून तिसर्‍यांदा रणशिंग फुकंत भाजपचा उमेदवार म्हणून स्वतःला घोषित केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्यातून सुनील शेळके तसेच रवींद्र भेगडे हे भाजपचे दोन बलाढ्य इच्छुक उमेदवार पुढे आल्याने राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पुढे मोठी अडचणी निर्माण झाली आहे. येणाऱ्या दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून तालुक्याची उमेदवारी नेमकी कोणाला मिळते, तसेच बाळा भेगडे यांना पक्षाने उमेदवारी दिलीच तर ते यांची आमदारकीची हॅट्रिक पूर्ण होते का, हे पाहणे महत्त्वाचा ठरणार आहे.

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 02:16 PM IST

ताज्या बातम्या