पुण्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय का? अजित पवार यांनी केला मोठा खुलासा

पुण्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय का? अजित पवार यांनी केला मोठा खुलासा

अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

  • Share this:

बारामती, 11 जुलै: पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, या निर्णयामुळे पुणेकर नाराज झाले आहे. तसेच या निर्णयाला व्यापारी संघानेही कडाडून विरोध केला आहे. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा...राज्यात सत्तेच्या वाट्यात एकत्र असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीत इथे मात्र मतभेद!

पुण्याच्या लॉकडाऊन संदर्भात आपण घेतलेला निर्णय हा एकतर्फी नसून तर व्यापक लोकहित व प्रशासनाकडून आलेल्या माहिती व सूचनांचा विचार करुनच हा निर्णय घेतलेला आहे, असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्याच्या लॉकडाऊन संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याची टीका केली आहे. एकाही आमदार, खासदाराला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे गिरीश बापट म्हणाले आहे. त्यावर अजित पवार यांनी बारामतीत हा खुलासा केला आहे.

लॉकडाऊनचा निर्णय घेताना पुणे शहराची सध्याची परिस्थिती, कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढणारी संख्या, नागरीकांचे स्वयंशिस्तीचे पालन न करणे, तसेच प्रशासनाकडूनही ज्या सूचना आल्या होत्या, त्याचा व्यापक विचार केलेला आहे. हा निर्णय कोरोनावर मात करण्याच्या उद्देशानेच घेतला आहे. त्यामुळे त्यात एकतर्फी असायचे काही कारण नाही, असेही अजित पवार सांगितलं आहे.

या संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनाही याची कल्पना होती. फोनवरुन जे लोकप्रतिनिधी उपलब्ध झाले त्यांनाही याची कल्पना दिली होती. लॉकडाऊनच्या संदर्भात पुण्याच्या महापौरांनाही याची माहिती दिली होती.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची शासनास आवश्यकता आहे. राज्य शासन म्हणून आम्हीही सर्व बाजूंचाच विचार नेहमी करत असतो. मात्र, हे करताना व्यापक जनहिताला प्राधान्य द्यावे लागते, प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात.

हेही वाचा...BMC च्या सहा.आयुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, 'हा' रेड झोन आणला होता ग्रीन झोनमध्ये

केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपाययोजना अंमलात आणलेल्या आहेत. त्या मुळे त्याचाच अवलंब भारतातही अनेक राज्ये करीत आहेत. आर्थिक स्तरावर अनेकांचे नुकसान होत आहे, याची जाणीव आहे, मात्र तरीही लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

Published by: Sandip Parolekar
First published: July 11, 2020, 8:17 PM IST

ताज्या बातम्या