पुणे, 8 डिसेंबर : करारी पोलीस अधिकारी आणि उत्कृष्ट लावणी कलावंत या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीकडं असतील तर ती व्यक्ती किती दुर्मिळ गटातील आहे, हे तुम्हाला समजू शकेल. पुण्यातील पीएसआय सुरेखा कोरडे या अशा अत्यंत दुर्मिळ गटातील व्यक्ती आहेत. घरातील अठारा विश्व दारिद्र्यावर मात करत त्यांनी या दोन्ही गोष्टी सिद्ध केल्या आहेत.
आईसोबत केली धुणीभांडी
सुरेखा यांच्या आई उपजिवेकेसाठी घरकाम करत असत. तर वडील पीएमटीमध्ये ड्रायव्हर होते. घरात पाच मुली... रोजचा खर्च कसा भागवायचा? ही त्यांना काळजी होती. सुरेखा यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येच करिअर करण्याची त्यांची इच्छा होती. पण, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं त्या आईसोबत इतरांच्या घरी धुणी-भांडी करायला जात. याच अडचणीतून मार्ग काढत त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. याच कालावधीमध्ये त्या लहान-मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमातील डान्स स्पर्धेत सहभागी होत असत. पण, माझ्या वडिलांचा डान्सला कडाडून विरोध होता, असं सुरेखा सांगतात.
आपण नृत्याकडे कसे वळलो याची आठवण सांगताना सुरेखा कोरडे यांच्या डोळ्यासमोरून ते दिवस उभे राहतात आणि अंगावर काटा येतो. 'दहावीत असताना कराटेच्या स्पर्धेसाठी सुरेखा यांना काठमांडूला जायचं होतं. पण त्यासाठी 9 हजार रुपये फी होती. आता फी भरण्यासाठी तर पैसे नव्हते. मग त्यांना एका नृत्य स्पर्धेची जाहिरात कळाली. त्यांनी त्या स्पर्धेत सहभाग घेतला फक्त सहभागाच नाही तर त्या स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक देखील पटकावला. त्यावेळी 12 हजार रुपये बक्षीस रक्कम त्यांना मिळाली. याच रकमेतून त्यांनी काठमांडूच्या कराटे स्पर्धेत भाग घेतला आणि सिल्व्हर मेडल जिंकले. सुरेखा कोरडे यांच्या नृत्याच्या करियरला इथूनच सुरवात झाली.
MPSC Exam : हमालाच्या पोरीने करून दाखवलं.... राज्यात आली पहिली!
लावणीला परवानगी मिळाली पण....
सुरेखा यांनी स्वतःला नृत्य करण्याचा छंद असल्यामुळे लावण्यखणी या लावणी कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पण, समाजाची चिंता असल्यानं वडिलांचा लावणीला मोठा विरोध होता. घरातून विरोध असल्यानं बाहेरुनही अनेक अडचणी आल्या. पण, सुरेखा यांनी आपली आवड जोपासण्यासाठी वडिलांना न सांगता अनेक शो घातले. अखेर, 'तू शिक्षण पूर्ण केलंस तरच आम्ही तुला लावणी करायला परवानगी देतो, अशी वडिलांनी अट घातली. या अटीनंतर लावणीच्या आवडीमुळे सुरेखा यांनी पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.
PSI का बनल्या ?
पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर सुरेखा यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आपण लावणी कलाकार असो किंवा नसो, एमपीएससी अधिकारी झालो तर ती ओळख शेवटपर्यंत आपल्यासोबत असेल. आपल्या आई-वडिलांना समाजात कुणीही हिणवू नये म्हणून त्यांनी हा अभ्यास सुरू केला.
लावणी कार्यक्रमाच्या निर्मात्यांनीही आपल्याला सहकार्य केलं. प्रवासात गाडीमध्ये खास बर्थ तयार करत अभ्यासाची सोय करुन दिली, असं सुरेखा यांनी सांगितलं. तीव्र इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम या जोरावर त्या पोलीस अधिकारी बनल्या. सध्या त्या गुन्हे अन्वेषण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
Video : लावणीसमोर उभं ठाकलं मोठं संकट, कलाकारांनी सांगितलं नेमकं कारण!
पुरस्कारानं गौरव
सुरेखा यांना लावणी क्षेत्रातल्या योगदानाबाबत गदिमा आणि राजश्री शाहू पुरस्कारही मिळाला आहे. आपल्या आवडीपेक्षा आई-वडिलांचा सन्मान त्यांना महत्त्वाचा वाटतो. त्यामुळेच त्यांनी पोलीस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. 'समाजानं लावणीला नावं ठेवणं बंद केलं पाहिजे. त्यांनी याकडं बघण्याची दृष्टी बदलावी. ज्या मुली, कलाकार या क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनीही काम सुरू ठेवावं. शिक्षण कधीही सोडू नका. मी नृत्य करताना शिकले नसते तर आज इथं नसते, असंही सुरेखा सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Pune, Success story