पुणे, 10 ऑक्टोबर: काल सायंकाळी सहा वाजल्यानंतर पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी (Heavy rainfall in pune) लावली आहे. तासभर पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शहरातील अनेक ठिकाणांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. रस्त्यांवरून गुडघाभर पाणी वाहत असल्याने अनेक रस्त्यांना नदीचं रुप आलं होतं. यानंतर आजही पुण्यासह मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्हे वगळता आज राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.
गुजरात, राजस्थाननंतर उत्तरेतील काही राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. असं असलं तर राज्यात मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रकोप सुरू आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा-ऑपरेशन कवचकुंडल आहे तरी काय? नगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्ण वाढले
हवामान खात्यानं आज पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, आणि नांदेड या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा-पुण्यात पावसाचं धूमशान; रस्ते जलमय झाल्याने वाहतूक कोंडी, घरांमध्येही शिरलं पाणी
उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. उद्या मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यानंतर मंगळवारपासून राज्यात पावसाचा जोर आणि कमी होणार आहे. तर बुधवार आणि गुरुवारी राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र