Home /News /pune /

पुण्यात कोरोना स्थिती गंभीर! ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णसंख्येत भलतीच वाढ

पुण्यात कोरोना स्थिती गंभीर! ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णसंख्येत भलतीच वाढ

पुण्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येचा (Corona Cases In Pune) आलेख आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अशातच पुणे महानगपालिकेच्या iHeal या अॅपमधून आणखी एक नवा खुलासा झाला आहे.

    पुणे 24 फेब्रुवारी : पुण्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येचा (Corona Cases In Pune) आलेख आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अशातच पुणे महानगपालिकेच्या iHeal या अॅपमधून आणखी एक नवा खुलासा झाला आहे. या अॅपमध्ये दाखवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 या काळात रुग्णांची संख्या जरी कमी नोंदवली गेली असली, तरी ऑक्सिजनची आवश्यकता (Oxygen Requirement) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या अॅपच्या माध्यमातून वेगवेगळ्या रुग्णालयांमधील डाटा एकत्र केला जातो. याच माहितीनुसार, जुलै 2020 मध्ये 16.30 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता होती. मात्र, जानेवारी 2021 पर्यंत हा आकडा 64.30 टक्क्यांवर गेला आहे. या आकड्यातील मोठा फरक चिंता वाढवणारा आहे. हा डाटा एक दिलासादायक बाबही स्पष्ट करत आहे. ती म्हणजेच व्हेंटिलेटरची गरज भासणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, ऑक्सिजनची गरज न भासणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. महापालिकेचं iHeal हे अॅप विशेषतः वेगवेगळ्या रुग्णालयांमधून रुग्णांची आणि गंभीर अवस्थेतील रुग्णांची माहिती घेण्यासाठी बनवण्यात आलं आहे. अॅपमधून रुग्णांना असणाऱ्या औषधांची आवश्यकता, लिंगानुसार विभाजन आणि रुग्णांची अवस्था अशी बरीच माहिती मिळवता येते. जानेवारी 2021 मध्ये विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 64.30 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचं यातूनच स्पष्ट झालं आहे. तर, 14,40 टक्के रुग्णांना जुलै 2020 मध्ये व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. हा आकडा मोठ्या प्रमाणात खाली आला असून जानेवारी 2021 मध्ये केवळ 2.20 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडली. हा अहवाल 25 जुलै 2020 ते 26 जानेवारी 2021 या काळात रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांवर आधारित आहे. याद्वारे तब्बल 13 हजार 311 रुग्णांचा अभ्यास केला गेला आहे. यात बहुतेक रुग्णांचं वय 53 ते 69 च्या दरम्यान आहे. यातील 68 टक्के पुरुष आहेत. 14.4 टक्के मधुमेहाचे रुग्ण आहेत, तर 16 टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. नोबल रूग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. एच. के. सेल म्हणाले, की अनेक रुग्ण असे आहेत जे घरीच विलगीकरणात आहेत मात्र त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. टक्केवारीबद्दल बोलताना ते म्हणाले, की ऑक्टोबर महिन्यात किंवा त्यानंतर रुग्णालयता दाखल झालेले बहुतेक रुग्ण हे अशा वेळी रुग्णालयात दाखल झाले, जेव्हा त्यांना ऑक्सिजन किंवा वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासली, त्यामुळे याची टक्केवारी अधिक आली. कोरोना रुग्णसंख्या - 23 फेब्रुवारीला दिवसभरात पुण्यात 661 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. तर, 358 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील 7 कोरोना रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. यातील 3 रुग्ण पुण्याबाहेरील होते. 201 रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यातील आतापर्यंतची कोरोना रुग्णांची  संख्या 198953 इतकी आहे. तर, सध्या 3 हजार 201 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 4 हजार 834 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत १९०९१८ रुग्ण बरे झाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Coronavirus, Pune, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या