कोरेगाव भीमा हिंसाचार: मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंसह 163 जणांना जिल्हाबंदी

कोरेगाव भीमा हिंसाचार: मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंसह 163 जणांना जिल्हाबंदी

1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता.

  • Share this:

पुणे,23 डिसेंबर: हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह 163 जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिडे आणि एकबोटे यांना जिल्हा बंदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देण्याचे ठरवण्यात आले. 'कार्यक्रम सुरळीतपणे होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,' असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.

बैठकीला पाटील यांच्यासह पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भीमा कोरेगाव शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे; तसेच भीमा कोरेगाव, पेरणे, वढू बुद्रुक आदी गावांतील नागरिक उपस्थित होते.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार आक्रमक

भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर झालेल्या एल्गार परिषदेतील लोकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'या प्रकरणात पुणे पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत अनेक साहित्यिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडून तपास काढून घ्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

'एल्गार परिषदेत नामदेव ढसाळ यांच्या 'रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो' ही कविता म्हटली म्हणून काही जणांवर खटले दाखल करण्यात आले. पोलिसांनी आपल्या अधिकाराचंचा गैरवापर केला. अशा पोलिसांचं निलंबन करून निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमावी. तीव्र मते मांडली म्हणून ज्यांना तुरुंगात टाकलं त्याबाबत चौकशी करावी,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

CAA आणि NRC ला शरद पवारांचा विरोध

'नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शरद पवार यांनी पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे. विचारवंत, साहित्यिक यांचाही या कायद्याला विरोध आहे. यामध्ये मॅगसेसे अवॉर्ड विजेते अरुंधती रॉय अॅडमिरल रामदास, अल्पसंख्य समाज, विचारी लोकांचा अशा अनेक घटकांचा या कायद्याला विरोध आहे,' अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. मात्र याविरोधात आंदोलन करताना हिंसा करू नका, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 23, 2019, 9:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading