warmest January : पुणेकरांचा जानेवारी थंडीविना, 41 वर्षात पहिल्यांदा झाली ही गोष्ट

warmest January : पुणेकरांचा जानेवारी थंडीविना, 41 वर्षात पहिल्यांदा झाली ही गोष्ट

यंदा जानेवारीतही पुणेकरांना गुलाबी थंडीचा आनंद घेता आला नाही. विशेष म्हणजे यंदाचा जानेवारी महिना पुणेकरांसाठी गेल्या 41 वर्षांतील सर्वाधिक उबदार (warmest January In Pune) गेला.

  • Share this:

पुणे 2 फेब्रुवारी : यंदाचं वर्ष हवामान आणि वातावरणाच्या बाबतीत काहीसं वेगळंच ठरलं. जानेवारी महिना म्हटलं, की डोळ्यांसमोर येते ती हाडं गोठणारी थंडी. मात्र, यंदा पुण्यात आक्रीतच घडलं (January Temprature In Pune) आहे. जानेवारीतही पुणेकरांना गुलाबी थंडीचा आनंद घेता आला नाही आणि विशेष म्हणजे यंदाचा जानेवारी महिना पुणेकरांसाठी गेल्या 41 वर्षांतील सर्वाधिक उबदार (warmest January In Pune) गेला.

गेल्या महिन्याभरात पुण्यात किमान तापमानाची नोंद 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाली नाही, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. गेल्या महिन्यात  28 जानेवारीला किमान तापमान12.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. गेल्या 41 वर्षांत पहिल्यांदाच जानेवारीत किमान तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे.

साल 1980 पासून पुण्यात जानेवारी महिन्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या पुढे फक्त 3 वेळा म्हणजेच 1988 मध्ये 10.2, 2007 मध्ये 10.3 आणि 2021 मध्ये 12.3 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. जानेवारी हा पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो. काही वर्षी तर पुण्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला होता. 1994 मध्ये 4.4, 1997 आणि 2006मध्ये 4.7, 1984 मध्ये 5.1 आणि 2011 मध्ये 5.3 अंश सेल्सिअस इतका पारा नोंदवला गेला होता.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, हिमालयाच्या पर्वत रांगांवर होणाऱ्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट निर्माण होत असते. उत्तरेतून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहतात, त्यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा घसरतो. मात्र, यंदा उत्तर भारतामध्ये थंडीची लाट असली तरी मध्य महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानं अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे या भागाच्या दिशेने वाहू लागले. या प्रभावामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रात उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवला नाही.

याशिवाय दक्षिणेकडून नैऋत्यकडे कायम वारे वाहत असल्यामुळे महाराष्ट्रातील हवेमध्ये आर्द्रता होती. ही बाष्पयुक्त हवा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या संपर्कात आल्यानं ढगाळ वातावरण निर्माण झाले. यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदवला गेला. याच कारणामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या.

काय असेल हवामानाची पुढील दोन दिवसातील स्थिती -

पुण्यात बुधवारी दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहिल. तर, यासायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहाण्याची शक्यता आहे. याशिवाय पहाटे धुके पडण्याची शक्यताही हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. तर, गुरुवारी आकाश अंशतः ढगाळ राहून धुके पडण्याची शक्यता आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 2, 2021, 8:21 PM IST

ताज्या बातम्या