मंगलदास बांदल यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे...

शिरूर तालुक्‍यातील वादग्रस्त आणि पहिलवान नेता मंगलदास बांदल यांच्या दोन घरांवर आज पहाटे तीन वाजता प्राप्तिकर खात्याने छापा टाकला.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2017 08:52 PM IST

मंगलदास बांदल यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे...

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

शिक्रापूर, 16 ऑगस्ट : भावी आमदार म्हणून फ्लेक्सबाजी करणारे आणि पुणे जिल्ह्यातील राजकारणात अनेक राजकीय कोलांट्या मारून चर्चेत राहिलेल्या शिरूर तालुक्‍यातील पहिलवान नेता मंगलदास बांदल यांच्या दोन घरांवर आज पहाटे तीन वाजता प्राप्तिकर खात्याने छापा टाकला. या नेत्याच्या शिक्रापूर, महंमदवाडी दोन्ही ठिकाणच्या निवासस्थानांबरोबर त्यांचे मित्र व जवळचे नातेवाईक या सगळ्यांच्याच घराची झडती प्राप्तिकर खात्याच्या पथकाने सुरू केली.

शिक्रापूरच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्द सुरू करून शिरुर तालुक्‍यासह जिल्ह्याच्या राजकारणातही कायम वादात राहिलेल्या बांदलांनी झेडपीच्या बांधकाम विभागाचे सभापती म्हणूनही काम केले आहे. याशिवाय त्यांच्या पत्नी रेखा बांदल या देखील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. शिरूर तालुक्‍यातील एमआयडीसी उद्योगात बराच हात मारल्याबद्दल या नेत्याची पंचकृषीत भलतीच ख्याती आहे. पोलिसांच्या तडीपार गुंडाच्या यादीत या नेत्याचा कधी काळी समावेश होता. आलिशान गाड्यांचा या नेत्याला शौक आहे. या नेत्याच्या अनेक निवडणुकांत पैशाचा कसा वापर होतो, याच्या कथा आजही चुरसपणे चर्चिल्या जातात.

या संपूर्ण कारवाईत शहर पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून स्थानिक व जिल्हा पोलिस दलाला या कारवाईत सहभागी करुन घेतलेले नाही. वास्तविक ग्रामीण भागातील इतर स्थानिक पोलिस स्टेशनच्या स्टेशन डायरीत नोंद करुन इतर पोलिस स्थानिक कारवाई करतात. मात्र आजच्या कारवाईत अशी कुठलीच कामकाज पद्धत वापरली गेली नसल्याने जिल्हा पोलिसांना या कारवाईपासून चार हात दूरच ठेवल्याचीही चर्चा आहे. आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी कारवाईच्या ठिकाणी पोहचल्यावर पोलिसांनी आणि या कारवाईतल्या अधिका-यांनी माहितीही देण्यास टाळाटाळ केली. मात्र या कारवाईची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 08:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...