Home /News /pune /

...आणि पुणेकर झाले शहाणे, रानगवा सुखरुप माघारी परतला!

...आणि पुणेकर झाले शहाणे, रानगवा सुखरुप माघारी परतला!

आधीचा अनुभव पाहता यंदा वन विभागाने जास्त खबरदारी घेत सुरक्षितपणे रानगव्याला आल्या पावली परत पाठवण्यात यश मिळवले आहे.

    पुणे, 22 डिसेंबर : पुण्यात कोथरूडमध्ये काही दिवसांपूर्वी एका रानगवाच्या (Indian gaur ) रेस्क्यू करत असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर आज बावधनमध्ये आणखी एका गव्याचे दर्शन झाले. पण, आधीचा अनुभव पाहता यंदा वन विभागाने जास्त खबरदारी घेत सुरक्षितपणे रानगव्याला आल्या पावली परत पाठवण्यात यश मिळवले आहे. आज सकाळी पुण्यातील बावधान परिसरात हायवे लगत अचानक एका रानगव्याचे दर्शन झाले. हायवेच्या बाजूला असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला होता. पुण्यात दुसऱ्यांदा गवा आल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी  रेस्क्यू करण्यासाठी  घटनास्थळी उपस्थित झाले होते. कोथरुडमध्ये रेस्क्यू करत असताना गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून गव्याला पकडण्या ऐवजी त्याच्या मार्गाने परत जाऊ देणं हेच योग्य ठरेल, असं   उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर सर्वात आधी नाल्यातून त्याला बाजूला जाऊ नये म्हणून जाळी टाकण्यात आली होती. ज्यामुळे गवा  पुन्हा आलेल्या रस्त्याने परत जाऊ शकेल किंवा तेवढा एकच पर्याय राहिल अशी युक्ती लढवण्यात आली होती. अखेर रानगव्याने समोर येण्यास मार्ग नसल्यामुळे आल्या त्या दिशेनं कूच केली. काही वेळाने गव्याला टेकडीवर पाठवण्यात वन विभागाच्या आणि रेस्क्यू टीमाला यश आले. गवा सुखरुप पोहोचल्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, 9 डिसेंबर रोजी कोथरूड परिसरातल्या महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकमध्ये  गवा आढळून आला होता. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही काळाने तो गवा असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि वन विभागाने धाव घेतली. तोपर्यंत गव्याला पाहण्यासाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केली होती. दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन राबवल्यानंतरही रानगवा हाती लागला नाही. पण, जमलेल्या लोकांनी गोंधळ घातल्यामुळे रक्तदाब वाढल्यामुळे गव्याने प्राण सोडले. इमारतींच्या जंगलात हरवलेला आणि माणसांना घाबरून जिवाच्या आकांताने धावणाऱ्या गव्याचा अंत झाला होता. या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या