बारामती, 16 सप्टेंबर : संत श्री. बाळूमामाचा (Balu Mama) अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दि. १० सप्टेंबरपासून पोलीस कोठडीत असलेले मनोहर उर्फ मामा भोसले (Manohar Mama) यांच्या कोठडीत बारामती न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली. 11 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.
गुरुवारी रोजी ती संपल्याने तालुका पोलिसांकडून त्याला न्यायाधीश एन. व्ही. रणवीर यांच्यापुढे हजर करण्यात आले. मागील वेळा प्रमाणे गुरुवारीही मनोहर भोसले यांच्या भक्तांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. भोसले याच्या बाजूने ॲड. हेमंत नरुटे यांनी म्हणणे मांडले. सरकार पक्षाकडून ॲड. एन. पी. कुचेकर यांनी काम पाहिले. (Increase in the difficulty of Manohar Mama who cheats by claiming to be the incarnation of Balumama)
मनोहर भोसले याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत, त्यांना अटक करायची आहे, मनोहर भोसलेकडे गुन्ह्यातील रक्कम व अन्य बाबींचा तपास बाकी आहे, त्यामुळे पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत त्यात तीन दिवसांची वाढ केली. शुक्रवारी 10 तारखेला सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले यांना ताब्यात घेत बारामतीत आणत अटक केली होती.
हे ही वाचा- बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक, मनोहरमामा भोसलेंवर गुन्हा दाखल
बारामतीतील शशिकांत खऱात यांच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जिवीताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी भोसलेसह त्याचे साथीदार विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे फरार आहेत. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.