Home /News /pune /

इम्तियाज जलील यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना टोलमाफी? पुणे-मुंबई महामार्गावर टोल न घेता गाड्या सोडल्या

इम्तियाज जलील यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना टोलमाफी? पुणे-मुंबई महामार्गावर टोल न घेता गाड्या सोडल्या

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्याबरोबर असलेला कार्यकर्त्यांचा मोठा ताफा हा पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन विभागून मुंबईच्या दिशेने रवाना झालाय.

  पुणे, 11 डिसेंबर : एमआयएम (AIMIM) पक्षाकडून मुंबईत तिरंगा रॅलीचं (Tiranga Rally) आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे आज सकाळी शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबाद (Aurangabad) येथून मुंबईच्या (Mumbai) दिशेला रवाना झाले आहेत. दुसरीकडे मुंबईत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सभा, रॅलीला परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तरीही इम्तियाज जलील हे मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे जलील यांचा ताफा जेव्हा पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोलनाक्यावर दाखल झाला तेव्हा एक विचित्र चित्र बघायला मिळालं. टोल नाक्यावर जलील यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांकडून टोल आकारला गेला नाही. त्यामुळे खासदारांसोबत असलेल्यांसाठी वेगळा आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इम्तियाज जलील यांच्याबरोबर असलेला कार्यकर्त्यांचा मोठा ताफा हा पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन विभागून मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. मात्र पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून टोल आकारणी देखील केली जात नसल्याने सर्वसामान्यांना वेगळा न्याय असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

  इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे उर्से टोल नाक्यावरुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन जलील मुंबईकडे रवाना झाले आहेत. हजारो गरीब मुस्लिमांच्या वक्फच्या जमिनी लाटल्या गेल्या आहेत. त्या गरीब मुस्लिम लोकांच्या 93 हजार  हेक्टर जमिनी या केवळ कागदोपत्री आहेत. त्या जमिनी कुठे गेल्या? तर काही जमिनींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर काही जमिनींवर काँग्रेसच्या नेत्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी कब्जा केला आहे. तसेच मुस्लिम आरक्षण दिल गेलं पाहिजे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हजारोंच्या संख्येने मुंबईत जात असल्याची प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. हेही वाचा : नागपूरातील पाणीपुरीवाल्याच्या प्रेमात पडली MPची तरुणी;काही दिवसात पोलिसात रवानगी

  एमआयएमची मुंबईत सभा

  मुंबईतील चांदिवली येथील शाळेच्या ग्राऊंडवर सभा होणार आहे. या रॅलीच्या संदर्भात आम्ही रितसर परवानगी पोलिसांकडून घेतली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही रॅली घेणार असं जाहीर केलं तेव्हा तेव्हा राजकारण होत रॅलीला परवानगी नाकारली गेलीय. त्यामुळे यावेळी आम्ही या रॅलीबाबत आधीच जाहीर केलेलं नव्हतं असंही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

  रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून नवे आदेश जारी

  मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून कडक नियम लागू करण्यात आले आहे. मुंबईमध्ये पुढील 12 तारखेपर्यंत शहरात रॅली, मोर्चे किंवा कोणतेही आंदोलन करता येणार नाही, असे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहे. मालेगाव, अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी नसणार आहे. याबद्दल मुंबई पोलिसांनी नवे आदेश जारी केले आहे. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोव्हिडचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि संभांना परवानगी नसल्याचं मुंबई पोलिसांकडून आदेशात म्हटलं आहे. हेही वाचा : 'टीम बनवणं कठीण, बर्बाद करणं सोपं', विराटला हटवल्यामुळे भडकला भारतीय क्रिकेटपटू

  नाशिक, वाशीत एमआयएमच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध

  मुंबईत रॅली होऊ नये या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून प्रचंड प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी नाशिक येथे मालेगाव आणि धु्ळ्यातून येणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्द केलं. तसेच वाशी, खारघर येथेही पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. तिथेही कार्यकर्त्यांना मुंबईला जाण्यापासून रोखलं जात आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या