Home /News /pune /

अवैध दारू विक्रेत्याची महिला सरपंचाकडून धुलाई, पुणे जिल्ह्यातील घटनेचा VIDEO VIRAL

अवैध दारू विक्रेत्याची महिला सरपंचाकडून धुलाई, पुणे जिल्ह्यातील घटनेचा VIDEO VIRAL

संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दारू बंदी असलेल्या शिरुर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पुणे, 19 जून : अनेकदा सांगूनही गावात दारू विक्री करणारा व्यक्ती ऐकत नव्हता आणि पोलीस सुद्धा लक्ष देत नव्हते. मग शेवटी चिडलेल्या सरपंच महिलेने हातात दंडुका घेतला आणि या दारू विक्रेत्याचा चांगलाच समाचार घेतला. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावच्या दबंग सरपंच मनीषा खेडकर यांनी आज अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमास चांगलाच चोप दिला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दारू बंदी असलेल्या शिरुर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. पिंपरी दुमाला परिसरामध्ये सदर इसम हा गेल्या अनेक दिवसांपासून गावातील काही लोकांच्या राजकीय वरदहस्तामुळे दारूविक्री करत होता. मात्र या दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले होते. ही बाब वारंवार सरपंच मनीषा खेडकर यांना खटकत होती. या बाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही पोलिसांकडून तात्पुरती कारवाई होत होती आणि मग पून्हा दारु धंदे जोमात सुरू होत असे. त्यामुळे या दारु विक्रेत्याला धडा शिकवायचा या उद्देशाने मनिषा खेडकर यांनी तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन शेळके, पोलीस पाटील संतोष जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या दारू विक्रेत्यास चांगलाच धडा शिकवला. झालेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे व मनीषा खेडकर यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व लोकप्रतिनिधींनी या अवैध व्यवसायावर आळा घालावा, अशी मागणी मनिषा खेडकर व ग्रामस्थांनी केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमातून फिरू लागताच रांजणगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल जप्त केला आहे. संपादन- अक्षय शितोळे
First published:

Tags: Liquor, Pune news

पुढील बातम्या