पुणे, 25 जानेवारी: आपल्या पत्नीनं (Wife) आपला मोबाईल नंबर (Mobile Number) ब्लॉक (Block) केल्याचा राग अनावर झाल्याने पतीने (Husband) पत्नीवर चाकूचे सपासप वार (Stabbed) केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील (Pune) धायरी (Dhayri) भागात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी पतीवर इतकी रागावली होती, की तिने त्याचा मोबाईल नंबरही ब्लॉक करून ठेवला होता. वारंवार फोन करूनही संपर्क होत नसल्याचं दिसून आल्यामुळे चिडलेला पती तिच्या माहेरी पोहोचला आणि त्यानंतर झालेल्या वादाचं रुपांतर जीवघेण्या हल्ल्यात झालं.
काय आहे प्रकरण?
पुण्यात राहणाऱ्या 30 वर्षांच्या सचिन आमले नावाच्या तरुणाचा पाच वर्षांपूर्वी एका तरुणीशी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. सचिन हा गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होता, तर त्याची पत्नी स्टेट बँक ऑफ इंडियात काम करत होती. घरगुती कारणांवरून त्यांच्यात सतत भांडणं होत असतं. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्यानंतर पत्नी घर सोडून मुलांना सोबत घेऊन माहेरी राहायला गेली होती.
फोन केला ब्लॉक
काही दिवसांनी पत्नीला भेटण्यासाठी सचिन तिच्या माहेरी गेला. माहेरी पोहोचून तिला फोन लावण्याचा तो प्रयत्न करत होता. मात्र काही केल्या तिचा फोन लागत नव्हता. आपला फोन नंबर पत्नीनं ब्लॉक केला असल्याचं त्याच्या लक्षात आलं. यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि त्याने थेट तिच्या घरी पोहोचत तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. तिच्या मोबाईलमधील सेटिंग बदलून आपला ब्लॉक केलेला नंबर अनब्लॉक करण्याचा तो प्रयत्न करू लागला. त्यावेळी पत्नीनं त्याला विरोध केला आणि आपला मोबाईल त्याच्या हातातून हिसकावून घेतला. यावेळी झालेल्या भांडणानंतर सचिनने स्वतःकडचा चाकू बाहेर काढला आणि पत्नीवर सपासप वार केले.
पत्नी आणि मेहुण्यावर हल्ला
माझा नंबर ब्लॉक करतेस काय.. असं म्हणत सचिननं पत्नीच्या कंबरेवर, पोटावर आणि मानेवर चाकूचे वार केले. तिला मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या तिच्या भावावरही त्याने चाकूचे वार केले. यात सचिनची पत्नी आणि मेहुणा गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर सचिन घटनास्थळावरून पळून गेला.
हे वाचा-मुलांना एकटं सोडू नका'; 10 वर्षांच्या लेकाच्या आत्महत्येनंतर बापाची आर्त विनंतीपोलीस तपास सुरू
या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून सचिन हा एकेकाळचा अट्टल गुंड असल्याचं पोलीस रेकॉर्डवरून दिसून आलं आहे. पोलिसांनी सचिनच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं तैनात केली असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.