अनिस शेख,(प्रतिनिधी)
मावळ,8 डिसेंबर: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ पतीचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीनेच आपला मुलगा व प्रियकराच्या मदतीने खून केले असल्याची खळबळजनक घटना देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पंधरा दिवसांनंतर पोलिसांनी या खुनाचा छडा लावला असून प्रेमात अडथळा ठरत असल्याने प्रियकर आणि मुलांच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. प्रियकर आणि मुलाने गाडी अंगावर घालून, लोंखडी जॅक डोक्यात मारुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पतीला कुष्ठरोग असल्याने स्वत:ला,मुलांना कुष्ठरोग होईल, अशी पत्नीची धारणा होती. पतीच्या औषधोपचारांकरीता कमवत असलेले पैस कमी पडवत होते, अशीही कारणे खुनासाठी पुढे केली आहेत.
काय आहे प्रकरण?
दामोदर फाळके असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी दामिनी दामोदर फाळके,तिचा प्रियकर राजेश सुरेश कुरुप मुलगा वेदांत दामोदर फाळके याला अटक केली आहे. तर,दुस-या अल्पवयीन मुलाला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दामोदर फाळके यांची पत्नी दामिनी आणि आरोपी राजेश कुरुप यांचे 12 वर्षांपासून प्रेमसंबंध आहे. राजेश हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. तर दामिनी मारुंजीत छोटेखानी हॉटेल चालवते. तिचे पती दामोदर हे एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. दामोदर फाळके यांचा 23 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता मामुर्डीतील गोदरेज कंपनीजवळ मुंबई एक्सप्रेस वेच्या सर्व्हिसरोड लगत गाडीवरुन पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा वेदांत फाळके यांने अपघाती मृत्यू झाल्याची खबर पोलिसांत दिली होती. परंतु, पोलिसांना संशय आला. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल राखून ठेवण्यात आला. वैद्यकीय अधिका-यांनी दामोदर फाळके यांचा मृत्यू अपघाती नसून घातपाताने झाल्याचे स्पष्ट अभिप्राय दिला.
पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविली. घरगुती कारणातून खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी राजेश कुरुप, मुलगा वेदांत फाळके आणि दुस-या मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आपले दामोदर याची पत्नी दामिनी हिच्याबरोबर 12 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे आरोपी राजेशने सांगितले. प्रेमसंबंधाला अडथळा ठरत असल्याने आरोपी दामिनी हिने पतीचा काटा काढण्याचे ठरवले होते. हेच खुनाचे मूळ कारण आहे. तसेच आजार आणि कर्जाचे कारण पुढे केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी दामोदर फाळके यांचा चारचाकीने उडवून खून करुन अपघात झाला आहे, असा बनाव करायचा कट रचला होता. त्याप्रमाणे 22 नोव्हेंबर रोजी आरोपी दामिनी, मुलगा वेदांत, अल्पवयीन मुलगा हे तिघे त्यांच्या मारुंजीतील हॉटेलमध्ये थांबले. रात्री अकरा वाजता दामोदर कामावरुन हॉटेलमध्ये आले. हॉटेल बंद करुन दामिनी, अल्पवयीन मुलगा एका गाडीवर, आरोपी वेदांत एका गाडीवर आणि दामोदर एका गाडीवर असे घरी जाण्यास निघाले. आरोपी दामिनी, वेदांत यांनी राजेश याला निघाल्याची आणि कोठपर्यंत आल्याची फोनवरुन सातत्याने माहिती दिली. दामोदर हे गोदरेज कंपनीचे वळणापाशी येताच आरोपी राजेशने चारचाकी गाडीची दामोदरला पाठीमागून धडक दिली.
धडकेत दामोदर रस्त्याच्या कडेला पडले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत हे दामिनीने राजेश यास फोन करुन सांगितल्याने राजेश पुन्हा तेथे त्याची चारचाकी घेवून आला. त्याने गाडीमधील लोंखंडी जॅक दामोदरच्या डोक्यामध्ये जोरात मारला. त्यावेळी दामोदरची व राजेशची झटापट झाली. दोघे रस्त्याच्या कडेला पडले. त्याचवेळी जवळच असलेला मुलगा वेदांतने शेजारी पडलेल्या दगड़ाने वडील दामोदर यांच्या डोक्यावर 3 वेळा आघात केला. दामोदर रक्ताच्या थारोळयात निपचीत पडले. दामोदर यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वजण घरी गेले. घरी गेल्यानंतर दामिनी दोन्ही मुलांना घेऊन दामोदर यांच्या कंपनीमध्ये जाऊन दामोदर यांचा शोध घेत असल्याचा बनाव केला. आरोपी वेदांत याने साईनगर येथील एक स्थानिक रहिवाशी यांना सोबत घेऊन पुन्हा शोधत असल्याचा बनाव केला. खून केलेल्या ठिकाणी जाऊन दामोदर यांचा अपघात झाला असल्याचे आई दामिनीला फोनवरुन सांगितले. तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे जावून अपघात झाल्याबाबत नोंद केल्याचे सांगून वेदांत आणि त्याच्या लहान भावाने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.