नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 16 मार्च : एक लडका और लडकी कभी दोस्त नही बनते... या वाक्यप्रचाराला छेद देत दोस्ती की है तो निभानी तो पडेगी असं तरुणाईवर बिंबवणारा नायक प्रेम म्हणजे सलमान खान. सलमान आणि मराठमोळी भाग्यश्री पटवर्धन यांचा 'मैने प्यार किया' हा सिनेमा 1989 साली प्रदर्शित झाला. तो त्या काळातील सुपर डुपर हिट सिनेमा आहे.
या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर तीन पिढ्या बदलल्या. तेव्हाचे प्रेम-सुमन आता आजी-आजोबा झाले. सध्याच्या प्रेम-सुमनचा तर तेव्हा जन्मही झाला नव्हता. पण मैने प्यार कियाचा गोडवा आजही प्रत्येक पिढीत कायम आहे. मैने प्यार किया प्रमाणेच सलमान खानही आजही तितकाच लोकप्रिय आहे. तेव्हाचा स्ट्रगलर आज सुपरस्टार बनलाय. बॉलिवूडच्या या भाईजानची प्रत्येक गोष्ट त्याचे फॅन्स फॉलो करतात. मैने प्यार कियामधील सलमान खानची गाजलेली बाईक आजही पुण्यातील एका फॅन्सनं जपली आहे. ती बाईक सध्या कशी आहे? कुणाकडे आहे? मुख्य म्हणजे ती सलमानच्या फॅनला कशी मिळाली? हा सर्व इतिहास कुणालाही माहिती नाही. हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सलमानची बाईक पुण्यात!
सलमान खाननं मैने प्यार कियामध्ये जपानीज मॉडेल 1984 ची होंडा बाईक वापरली होती. विंटेज बाईक कलेक्शनमध्ये या बाईकचं नावं आवर्जून घेतलं जातं. त्यावेळी या मॉडेलच्या 12-13 बाईक जहाजातून भारतामध्ये आणल्या होत्या. पुण्यातील निलेश आर्टिस्ट या तरुणाकडं ही बाईक आहे. ही बाईक त्याच्याकडं कशी आली याचा इतिहास निलेशनं सांगितला आहे.
'मैने प्यार किया' हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी मी बाईक चालवायला शिकत होतो. त्यावेळी ही माझी ड्रीम बाईक होती. मी सलमान खानचा फॅन आहे. बिग बॉसच्या सेटवर काम करत असताना फिल्म सिटीमध्ये मी ही बाईक पहिल्यांदा पाहिली. त्याचवेळी मी ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पन्नास हजार रुपयांना मी ही बाईक खरेदी केली.
ही बाईक खरेदी केल्यानंतक ती मॉडिफाय करण्यासाठी मला 60 ते 70 हजार रुपये खर्च आला. या बाईकचा कलर आणि त्याचे मुळ पार्ट इथं मिळत नाहीत. त्याचा शोध घेऊन मी ही बाईक मॉडिफाय केली. त्यामुळे ही बाईक आता पुन्हा नव्यासारखी दिसत आहे.
या बाईकला कंपनीकडून 120 चा अॅव्हरेज देण्यात आला होता. मात्र आता 34 वर्षांनंतर ही गाडी 90 चा अॅव्हरेज देत आहे. या बाईकवर मी गोवा. मुंबई, माथेरान फिरलो आहे, असं निलेशनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Local18, Pune, Salman khan