पुणेकरांसाठी पुढील 3 दिवस महत्त्वाचे.. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणेकरांसाठी पुढील 3 दिवस महत्त्वाचे.. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

नोव्हेंबर महिन्यातही कोसळू शकतात पावसाच्या सरी...

  • Share this:

पुणे,31 ऑक्टोबर: पुणेकरांसाठी पुढील 3 दिवस महत्त्वाचे आहे. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान पुणे शहर तसेच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, 2 नोव्हेंबरनंतर पाऊस पूर्णपणे थांबेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. ग्लोबल वॉर्मिंग तसेच उशीराने झालेलं मान्सूनचे आगमनाचा परिणाम म्हणून नोव्हेंबर महिन्यातही पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाजही अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्याला मान्सूनोत्तर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसाने पुणेकरांसह शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. शेतातील पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत हाताशी आलेला घासही या पावसाने हिरावल्याने शेतकरी हताश झाला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचे 'ढग' गोळा झाले आहेत.

वादळी वारा, गारपीठीसह जोरदार पाऊस

पुणे जिल्ह्यातल्या शिरुर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात बुधवारी (30 ऑक्टोबर) वादळी वारा, गारपीठीसह जोरदार पाऊस झाला. जुन्नरमधील ओतूर रोहोकडी येथे मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पूराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. झालेल्या नुकसानाचे त्वरीत पंचनामे करुन मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गारपीटसह मुसळधार पाऊस, वीज कोसळून सात जणांचा जागेवरच मृत्यू

अकोला आणि अमरावती जिल्ह्यात बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. यात वीज कोसळून सात जणांचा जागेवरच मृत्यू झाला. गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज कोसळून अकोट व तेल्हारा तालुक्यात तीन तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे चार अशा सात जणांचा मृत्यू झाला. तसेच चार जण गंभीर जखमी झाले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा-नवाब मलिक

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमच्या आघाडीची मागणी राहणार असून त्यासाठी एक-दोन दिवसांत राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. त्याशिवाय राज्यात कारखानदारी बंद होवून बेरोजगारी वाढत आहे. या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आणि त्यावर काय उपाय योजना करता येईल, याबाबत आघाडीच्यावतीने राज्यपालांची भेट मागण्यात आली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या