पुणे, 05 नोव्हेंबर: सध्या लक्षद्विप आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण (Rain in Maharashtra) झाली आहे. पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा (Thunderstorm and lightning) इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवसात राज्यात पाऊस कोसळत असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडत आहे.
पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर रविवारी पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज पुण्यासह एकूण 12 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. याठिकाणी पुढील काही तासांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
5/11, महाराष्ट्रात पुढचे 2,3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. द कोकण,द मध्य महाराष्ट्रात व मराठ वाडा संलग्न भागात ☔🌩 - IMD pic.twitter.com/0hyRHE9yA3
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 5, 2021
आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, रायगड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि अहमदनगर या बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिक,आणि नांदेड या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. उद्या राज्यात पावसाचा जोर मंदावणार असून कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. उद्या पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा-कोरोनानं पुन्हा काढलं डोकं वर? 53 देशांनी वाढवली चिंता, नव्या लाटेची शक्यता
रविवारीपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होणार आहे. रविवारी राज्यात सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त रविवारी पुणे, रायगड, सांगली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. दुसरीकडे, गोव्यातील रडार यंत्रणेनं उत्तर कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात तीव्र पावसाच्या ढगांच्या हालचाली नोंदल्या आहेत. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast