पुणे, 16 नोव्हेंबर: नैऋत्य मोसमी वारे परत गेल्यानंतर, राज्यात अनेक ठिकाणी पावसानं उघडीप घेतली. पण सध्या दक्षिण भारतात सक्रिय असलेल्या ईशान्य मान्सूनमुळे महाराष्ट्रात देखील पावसासाठी (Rain in Maharashtra) पोषक हवामान निर्माण झालं आहे. दुसरीकडे अंदमान आणि अरबी समुद्रात देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे.
सध्या शेतीतील कापणीची कामं संपली आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील पिकांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी पांढरा कांदा, वाल, मूग आदी पिकांची लागवड करत आहेत. तसेच आंब्याला पालवी फुटण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अशा स्थितीत पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी धास्तावला आहे. आंब्याची पालवी कुजून मोहोर येण्याची प्रक्रिया लांबवणीवर पडण्याची भिती शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-नागपुरातील 20 मकाक माकडांच्या मदतीने बनली Covaxin; रंजक आहे निर्मितीची कथा
हवामान खात्याने आज एकूण चौदा जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तीन-चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. आकाशात विजा चमकत असताना, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव, दुसऱ्यादिवशी Covid बाधिताची नोंद
उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. आजपासून पुढील चारही दिवस पुण्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज आणि उद्या मुंबईत देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवार आणि शुक्रवारी देखील मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शनिवारनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून शनिवारी राज्यात कोणाताही इशारा देण्यात आला नाही. तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Weather forecast, महाराष्ट्र