पुणे, 09 नोव्हेंबर: गेल्या तीन-चार दिवसांपासून दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार (Heavy rainfall) हजेरी लावली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि केरळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. सध्या तामिळनाडू किनारट्टीवर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असून पुढील काही दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाला आहे. परिणामी पुढील तीन दिवस महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची (Dry weather in maharashtra) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पण विकेंडनंतर राज्यात पुन्हा तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि लातूर या सहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात पुढील 12 तासांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 11 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत तामिळनाडूच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पावसाचा प्रकोप असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-मुलांसाठी लस अजूनही नाहीच, DGCI च्या मंजुरीसाठी होतोय उशीर
पुण्यात थंडी वाढली
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राज्यातून माघार घेतल्यानंतर, पुण्यातील तापमानात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात किंचितशी वाढ झाल्यानंतर, पुण्यात पुन्हा एकदा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर याठिकाणी सर्वात कमी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचा-31 डिसेंबरपर्यंत सर्वांना नाही मिळणार कोरोना लशीचे दोन्ही डोस पण...
तापमानाचा पारा घसरल्याने पुणे शहरासह जिल्ह्यात पहाटे हवामानात गारवा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी शिरूरमध्ये सर्वात कमी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर पाषाण (11.9), हवेली (11.9), एनडीए (12.1), शिवाजीनगर (12.6), राजगुरुनगर (13.7), दौंड (13.8), माळीण (12.6), भोर (15.4), जुन्नर (15.3), चिंचवड (18.1) अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Weather, महाराष्ट्र