पुणे, 30 मार्च : गेल्या काही दिवसांपासून कोकण पट्ट्यात (Konkan) उष्णतेची तयार झाली होती. कोकणातील गरम हवा पुण्यासह (Pune Weather) मध्य महाराष्ट्रात येऊन धडकत होती. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध ठिकाणचं तापमान (Temperature in Maharashtra) वाढलं होतं. आता कोकणातील उष्णतेची लाट (Heat Wave in Konkan) दक्षिणेकडे सरकली आहे. पण पुण्यातील पारा चढाच राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. पुण्यासहित उर्वरित महाराष्ट्रात उन्हाळा चांगला जाणवू लागला आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर पुण्यात सोमवारी पहिल्यांदाच तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे.
पुण्यातील लोहगाव याठिकाणी तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला असून पारा 40.1 वर पोहचला आहे. याठिकाणी मार्चमध्ये पारा चाळीशी पार होण्याची 2008 पासूनची केवळ तिसरी वेळ आहे. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा पुणेकरांसाठी त्रासदायक ठरण्याची चिन्हं आहेत. पुण्यात मार्च महिन्यात खूप कमी वेळा तापमान 40 च्या पुढे जातं, यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा पारा वाढला आहे.
पुण्यात शिवाजीनगर परिसरातही तापमान चाळीशीच्या उंबरट्यावर पोहचलं आहे. येथील तापमान 39.3 अंश सेल्सियस असून हे तापमान सरासरीपेक्षा 2.6 ने अधिक आहे. पुण्यात रात्रीच्या वेळी आकाश निरभ्र असेल, तर दिवसभर तापमान 39 च्या आसपास राहणार आहे. तर पुण्यातील किमान तापमान हे 19 अंश सेल्सियस असणार आहे.
(वाचा- Temperature Today: महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला; पुढील 2 दिवस आणखी बसणार उन्हाचे चटके)
विदर्भ-मराठवाड्यातही वाढली दाहकता
आज आणि उद्या (31 मार्च रोजी) विदर्भ (Vidharbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहे. कारण 30 आणि 31 मार्च रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. चेहरा झाकण्यासाठी रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, त्याचबरोबर दिवसभरात भरपूर पाणी प्यावं, असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune