• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर

सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. रोज नव्या पुड्या सोडत आहेत. कर्मचारी फुटत नाहीत म्हणून खासगीकरणाची चर्चा सुरु केली, असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले.

 • Share this:
  पुणे, 19 नोव्हेंबर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा (ST employee protest) आपल्या विविध मागण्यांसाठी जवळपास महिन्याभरापासून संप सुरु आहे. या संपाच्या समर्थनार्थ भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे देखील संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोबत मुंबईत आझाद मैदानात (Azad Maidan) गेल्या दहा दिवसांपासून ठाण मांडून बसले होते. त्यानंतर आज संध्याकाळी ते पुण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला. तसेच एसटी महामंडळाचं जोपर्यंत राज्य शासनात विलनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार, असा इशारा पडळकरांनी दिला.

  गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

  "एसटी आंदोलनात मानवतेच्या भावनेतून सहभागी झालो आहे. सरकार वेडेपिसे झाले आहे. त्यांना सुचायचे बंद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पवारांची मोठी मान्यताप्राप्त संघटना आहे. पवारांनी आजवर मान्यताप्राप्त संघटनेला हाताशी धरुन कर्मचाऱ्यांवर अन्याय केला. पण कर्मचाऱ्यांना आता अन्यायाची जाणीव झाली आहे. जर प्रश्न मिटला तर पवारांच्या संघटनेचं दुकान बंद होईल. त्यामुळे निर्णय घ्यायला अडचण आहे", असा घणाघात गोपीचंद पडळकरांनी केला. हेही वाचा : अर्जुन खोतकरांनी 100 कोटींचा घोटाळा केला, किरीट सोमय्यांचा मोठा आरोप

  'महामंडळ बापजाद्याची जहागिरी आहे का?'

  "चर्चा काय करायची? विलीनीकरण हीच मागणी. दोन बैठकांत कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं? एकच मागणी आहे. सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. रोज नव्या पुड्या सोडत आहेत. कर्मचारी फुटत नाहीत म्हणून खासगीकरणाची चर्चा सुरु केली. एसटीतला भ्रष्टाचार थांबवला तरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांइतका पगार मिळू शकेल. महामंडळ बापजाद्याची जहागिरी आहे का? आम्ही दहा दिवस आझाद मैदानावर, तरीही आम्ही चर्चेसाठी सापडत नाही? 38 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी दुःख संपत नाही, हे दुर्दैव ! संपाचे नेतृत्व कर्मचारी करत आहेत. आमची सरकारशी चर्चेची तयारी पण सरकारला मार्ग काढायचा नाही", अशी टीका पडळकरांनी केली.

  'कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवर मुख्यमंत्र्यांचा एक शब्दही नाही'

  "मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने मागे घेतलेल्या तीन कृषी कायद्यांवर लगेच प्रतिक्रिया दिली. मात्र 38 मराठी कर्मचारी आत्महत्या करतात, त्यांच्या बायकांची कपाळे पांढरी झाली. त्यावर त्यांनी सांत्वनाचे दोन शब्द बोलले नाहीत", अशा शब्दांत पडळकरांनी खंत व्यक्त केली. हेही वाचा : आदित्य ठाकरेंसाठी सोडली जागा आता मिळाली आमदारकीची संधी, रामदास कदमांचा पत्ता कट

  'मी बहुजन असल्याने मला संपवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न'

  यावेळी गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील आटपाडी राडा प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. जिल्हा सत्र न्यायालयाने माझा जामीन अर्ज फेटाळला आहे. पण माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला तर मी स्वतः हजर होणार, असं पडळकर म्हणाले. खरंतर माझ्या गाडीवर हल्ला झाला. तीन डंपर दगडं भरुन हाणली होती. मी बहुजन असल्याने मला संपवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
  Published by:Chetan Patil
  First published: