Home /News /pune /

पुणे परिसरातील तरुणांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 18 हजार नव्या नोकऱ्या मिळणार

पुणे परिसरातील तरुणांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 18 हजार नव्या नोकऱ्या मिळणार

राज्यात 15 उद्योग येत असून त्यातील 8 उद्योग एकट्या पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये येत आहेत.

    पुणे, 16 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसच्या रुपाने आलेल्या जागतिक संकटामुळे बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊन काळात उद्योग-धंद्यांना मोठा फटका बसला आणि अनेक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. मात्र महाराष्ट्रातील युवकांसाठी दिलासादायक बातमी आली असून राज्यात 15 उद्योग येत असून त्यातील 8 उद्योग एकट्या पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये येत आहेत. पुण्यात येत असलेल्या 8 उद्योगांच्या माध्यमातून 18 हजाराहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. ऐन कोरोना संकटकाळात या नोकऱ्या उपलब्ध होत असल्याने तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. यु के, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार केले आहेत. पुण्यात कुठे उपलब्ध होणार नोकऱ्या? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 2 नोव्हेंबर रोजी एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. 15 कंपन्यांमार्फत जवळपास 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे 23 हजार 182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. उद्योग-धंद्यांसाठी पुणे परिसर गेल्या अनेक वर्षांपासून अग्रेसर राहिला आहे. पुण्यातील चाकण, हिंजवडी, रांजणगाव, तळेगाव इथं हे उद्योग येणार आहेत. पुण्यात येत असलेल्या बहुतांश कंपन्या या लॉजिस्टिक्स कंपन्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. राज्यात एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक येणार? '2 नोव्हेंबर रोजी झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक आता होते आहे ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल,' असं मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pune (City/Town/Village), Pune news

    पुढील बातम्या