पुण्यातील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्याच्या शस्त्रक्रियेसाठी निधी गोळा करण्याच्या मोहिमेला विरोध, जीवे मारण्याची मिळाली धमकी

पुण्यातील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्याच्या शस्त्रक्रियेसाठी निधी गोळा करण्याच्या मोहिमेला विरोध, जीवे मारण्याची मिळाली धमकी

ऋषीकेश राऊत उर्फ ऋषी (Rishikesh Raut) 23 वर्षीय नॉन-बायनरी ट्रान्स व्यक्ती सध्या ऑनलाईन ट्रान्सफोबिक गैरवर्तनाचं लक्ष्य ठरली आहे.

  • Share this:

पुणे, 15 जून: आपल्या देशात आजच्या आधुनिक काळातही तृतीयपंथी, समलिंगी लोकांकडे (LGBTQ) बघण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनात फारसा फरक पडलेला नाही. आजही या लोकांबद्दल समाजाची मानसिकता किती विकृत आहे याची प्रचिती पुण्यासारख्या शहरात एका ट्रान्सजेंडर कार्यकर्त्याला येत आहे. अत्यंत दुर्दैवाची अशी ही बाब आहे. ऋषीकेश राऊत उर्फ ऋषी (Rishikesh Raut) 23 वर्षीय नॉन-बायनरी ट्रान्स व्यक्ती सध्या ऑनलाईन ट्रान्सफोबिक गैरवर्तनाचं लक्ष्य ठरली आहे.

मिस्टी (Misty) या संस्थेसोबत गेली पाच वर्षे काम करणाऱ्या ऋषीने जेंडर अफर्मिंग शस्त्रक्रियेसह हार्मोनल थेरपी, लेझर थेरपी अशा काही शस्त्रक्रिया करण्याकरता निधी जमवण्याच्या उद्देशाने ऑनलाईन क्राऊडफंडिंग (Crowd Funding) प्लॅटफॉर्म केट्टोवर (Ketto) एक मोहीम सुरू केली आहे.

खरंतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी अशाप्रकारे निधी गोळा करणाऱ्या लोकांना सहानुभूती मिळते. लोक भरभरून मदतही करतात, पण ऋषीला मात्र अतिशय विदारक अनुभव येत आहे. त्याला 7 लाख रुपयांची गरज आहे, त्यापैकी 2 लाख 54 हजार 166 रुपये जमा झाले आहेत.

त्याने मोहीम सुरू केली तेव्हा सुरुवातीला काही देणग्या मिळाल्या, पण काही नकारात्मक, द्वेषयुक्त प्रतिक्रियाही मिळाल्या. त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर कोविड-19च्या दुसर्‍या लाटेमुळे (Covid-19 Second Wave) उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्याने आपली ही मोहीम स्थगित केली. जगभरात जून महिना एलजीबीटीक्यू समाजासाठी प्राईड मंथ (Pride Month) म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून त्याने पुन्हा आपली मोहीम सुरू केली. काही लोकांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्धी दिली. पण त्यामुळे निधी मिळण्यासाठी प्रतिसाद वाढण्याऐवजी ट्रोलिंगचं प्रमाण वाढलं.

केट्टोद्वारे मदत मिळणार्‍या व्यक्तीची कोणतीही माहिती उघड केली जात नाही, केवळ विनंतीनुसार लाभार्थ्याला ईमेल करण्याचा पर्याय आहे. ऋषीच्या केट्टोवरील पेजवरदेखील लाभार्थ्यांबाबत कोणतीही माहिती नमूद केलेली नाही.

त्यावरून त्याची ही मोहीम बोगस असल्याची टीका त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर सुरू झाली. ही पैशांची उधळपट्टी आहे, हे खोटं आहे, महत्त्वाच्या गोष्टीसाठी दान करावं अशा प्रतिक्रियांसह जातीयवादी टिप्पण्याही सुरू झाल्या. ऋषी बहुजन असल्याने त्याचा उल्लेख असणाऱ्या जातीवाचक प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणात झाल्या. त्याला इन्स्टाग्रामवर थेट मेसेज करून अत्यंत अश्लील, आक्षेपार्ह प्रतिक्रियादेखील आल्याचं ऋषीने सांगितलं.

(वाचा - पुरुषांना भारी पडतंय Work From Home; पुण्यात हेल्पलाईनवर होतेय मदतीची मागणी)

काहींनी जीवे मारण्याच्या धमक्यादेखील (Death Threats) दिल्या. जगण्याची लायकी नसलेली एक घृणास्पद व्यक्ती असून, तू जगण्यापेक्षा मेलेलं बरं आहे, असा संदेश पाठवण्यात आला आहे. तुम्हाला परवडत नसेल तर कशाला शस्त्रक्रिया करता असा सल्लाही अनेकांनी दिला आहे. सुरुवातीला ऋषीनं हा त्रास सहन केला, नंतर मात्र त्याला मानसिक दृष्ट्या हा त्रास सहन करणं असह्य झालं तेव्हा त्यानं सोशल मीडियावर ट्रोलर्सना उत्तर द्यायला सुरुवात केली. हे मेसेज सोशल मीडियावर आणण्यास सुरुवात केली.

अशा अनेक द्वेषयुक्त मेसेजमधील एक मेसेज ऋषीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या इन्स्टाग्राम डीएमवर एका व्यक्तीनं त्याला हा मेसेज पाठवला आहे. यामध्ये एलजीबीटीक्यूए ध्वजांवर लाल क्रॉस काढलेला फोटो असून, त्यासोबत लिहिलं आहे की, आपल्या मुलाला समलिंगी किंवा ट्रान्स किंवा लेस्बियन होण्यापासून वाचवण्यासाठी 10 जणांना हा संदेश शेअर करा.

आजच्या काळातली आधुनिक समाजाची ही विचारसरणी माणूस म्हणवून घेण्यास लायक आहे का असा प्रश्न पडावा इतकी हीन आहे. समाजाचं हे एक रूप दिसत असतानाच समाजातील अनेक लोक ऋषीच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ही बाब दिलासा देणारी आहे. अशा विकृत लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास त्यांनी ऋषीला प्रेरणा दिली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: June 15, 2021, 2:50 PM IST

ताज्या बातम्या