'ठाकरे गझनी तर शरद पवार पलटी मारणारे नेते', भाजपच्या माजी मंत्र्यांची विखारी टीका

'ठाकरे गझनी तर शरद पवार पलटी मारणारे नेते', भाजपच्या माजी मंत्र्यांची विखारी टीका

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था गझनी चित्रपटातील आमिर खान सारखी झाली आहे.'

  • Share this:

मंचर (पुणे), 11 ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था गझनी चित्रपटातील आमिर खान सारखी झाली आहे. दिलेली आश्वासने आता त्यांना आठवत नाहीत का? असा टोमणा मारत भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. 'शरद पवार हे पलटी मारणारे नेते आहेत. त्यांनी तर आत्मचरित्रात लिहलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या नियमनमुक्त झाल्या पाहिजेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांचं सरकार असताना शेती उत्पादनाचा कायदा केला. मग आता ते खोटं का बोलत आहेत?,' असा सवाल अनिल बोंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील किसान संवाद अभियान सभेत अनिल बोंडे बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी बिलाच्या स्वागताच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हाच्या वतीने मंचर येथे किसान संवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोंडे यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार टोलेबाजी केली.

चंद्रकांत पाटलांनीही केली होती टीका

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्र भाजपने राज्यभर मोर्चे काढले आहेत. तसंच भाजप नेत्यांकडून या कायद्याला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी टीका केली.

'केंद्र सरकारने काही कायदे केले की त्याला विरोध करण्यासाठी हवा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. कृषी कायद्यात पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेल्या मागण्याच आहेत. कृषी आणि कामगार कायदे जनहिताचेच आहेत. दोन्ही कायद्यांबद्दल आम्ही मोदींचं अभिनंदन केलं,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

Published by: Akshay Shitole
First published: October 11, 2020, 11:04 PM IST

ताज्या बातम्या