गोविंद वाकडे, (प्रतिनिधी)
सांगली, 14 ऑगस्ट- सांगलीतील पूर आता ओसरलाय. राज्यभरातून मदतीचा ओघही सुरू झालाय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,..ह्या ओळी मानसिक आधार देतील. मात्र, अनेकांचा निवाराच जमिनदोस्त झाल्याने त्यांना राहायला आणि अन्न शिजवायलाही जागा नाहीय, अशा परिस्थितीत मिळालेली मदत ठेवायची तरी कुठे? आणि जगायच तरी कसं, असे एक ना अनेक प्रश्न उद्ध्वस्त पुरग्रस्तसमोर उभे ठाकलयेत.
कृष्णेकाठी वसलेल्या वैभव संपन्न सांगलीचं आता बकाल नगरीत रूपांतर झालंय, कृष्णेच्या ह्या अथांग पात्रातील ज्या पाण्यानं आजवर सांगलीला समृद्ध केलं, त्याच पाण्यानं सांगलीकरांची सगळी स्वप्नं वाहून नेली. शेती खरडली, पीकं कुजली, आणि शेकडो घरांची अशी राखरांगोळी झाली, पूर ओसरल्यानंतर अनेकजण आपल्या घरी परतले. जमिनदोस्त झालेली घरं बघून अनेकजण अक्षरश: कोलमडले.
सांगलीतील महापुरामध्ये अनेकांचे संसार रस्त्यावर आले ते ह्याच अर्थाने, कधीकाळी पदरमोड करून एकेक वीट रचत उभारलेलं घर कोसळलं. ते पुन्हा उभा करताही आलं असतं पण तेवढं बळ आता ह्या पुरग्रस्ताच्या हातात राहीलं नाहीय.
सांगली जिल्ह्यात पुरामुळे हजारो घर धोकादायक झालेयत, हरिपूर पलूस ह्या दोनच गावातील जमिनदोस्त झालेल्या घरांची संख्या पाचशेच्या वर आहेत. पूर्ण जिल्ह्यात 30 हजारांच्यावर नागरिक बाधित आहेत.
सरकारी मदत मिळून पडलेलं घर उभं राहायला अनेक वर्षे लागतील.तोपर्यंत ह्यांनी राहायचं कुठं? हा खरा प्रश्न आहे.
पुराखाली गेलेल्या पुलावर तो धावला आणि अॅम्ब्युलन्सला मार्ग दाखवला, पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा