भीमा नदीच्या पुलावर झाला भीषण अपघात, यात्रेला जाणाऱ्या बाप-लेकीचा जागेवरच मृत्यू

भीमा नदीच्या पुलावर झाला भीषण अपघात, यात्रेला जाणाऱ्या बाप-लेकीचा जागेवरच मृत्यू

यात्रेसाठी गावी जाणाऱ्या बाप-लेकीवर वाटेतच काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तीन वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला.

  • Share this:

पुणे,12 जानेवारी: यात्रेसाठी गावी जाणाऱ्या बाप-लेकीवर वाटेतच काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तीन वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीवरील पुलावर शनिवारी ही घटना घडली. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.

सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील (वय-35), मुलगी आरोही सतीश वळसे-पाटील (वय-3, सर्व रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) अशी मृत बाप-लेकीची नावे आहेत. सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील यांची जयश्री या जखमी झाल्या आहेत.

वळसे-पाटील कुटुंबीय थापलिंग येथे यात्रेला निघाले होते. शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकने भीमानदी पुलावर वळसे- पाटील यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये सतीश आणि आरोही हे दोघेही ट्रकच्या पाठीमागील चाकाच्या खाली येऊन जागीच ठार झाले तर जयश्री या लांब फेकल्या गेल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी तिघांना तत्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सतीश आणि आरोही या बापलेकीला मृत घोषित केले. सतीश वळसे पाटील हे काळेवाडी (पिंपरी) येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रकचालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (वय-40, रा. वाळवी, ता. सिन्नर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरवर्षी दीड लाख लोक गमवतात प्राण..

भारतात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. यात दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. ही धक्कादायक आकडेवारी आहे. समाधानाची बाब म्हणजे, तामिळनाडूमध्ये अपघाताचे प्रमाण 29 टक्क्यांने तर मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यामुळे रस्ता अपघात कमी करणाऱ्या या तामिळनाडू पॅटर्नचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

जिल्हा सुरक्षा समिती, प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस नागपूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला. याच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मंचावर पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महामार्ग पोलीस अधीक्षक संजय शित्रे आदी उपस्थित होते.

संजय शित्रे म्हणाले, एकूण अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात दुचाकीचे होतात. यात हेल्मेट न घालणे, रॅश ड्रायव्हिंग, गतीवर नियंत्रण नसणे व वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे हे मुख्य कारण आहेत. यामुळे प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2020 02:10 PM IST

ताज्या बातम्या