पुणे, 27 मे, रायचंद शिंदे : बैलगाडा शर्यतीत बैलाइतके घोडीलाही महत्त्व आहे. बैलगाडा मालक जसं आपल्या देशी गोवंशापासून जातिवंत बैल तयार करतात आणि त्यांची निगा राखतात, तसेच आपल्या बैलगाड्या पुढे पळणाऱ्या घोडीलाही ते तितकाच जीव लावतात. शिरुर तालुक्यातील ढोक सांगवी गावच्या किरण दगडू पाचंगे यांनी अहमदनगरमध्ये 5 महिने वयाची एक घोडी 25 हजारांत विकत घेतली आणि तिला घरी आणताना त्यांनी तिला चक्क आपल्या महागड्या फॉर्च्युनर कारमध्ये आणले.या घोडीला कारमधून उतरवतानाचे व्हिडीओ एका बैलगाडा गृपवर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
चपळ घोडींना मागणी
उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं. त्यात या परिसरातील बैलगाडा हा चार बैलांचा असतो. गाड्याला 2 बैल जुंपतात त्यांना धुरेकरी म्हणतात. तर त्यांच्यापुढे पळणाऱ्या दोन्ही बैलांना चाव-हेकरी म्हणतात. या बैलगाड्या पुढे बैलांना दिशा देण्याचं काम घोडी करत असते. ही घोडी खूप चपळ असावी असं प्रत्येकाला वाटत असतं.
याच नादातून घाटामध्ये जोरदारपणे पळणारी घोडी आपल्याकडे असावी असं प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं. मग घोडीचं लहान शिंगरू( पिल्लू ) आणून त्याची लहानपनापासून काळजी घेत तिला शर्यतीसाठी तयार केलं जातं. या परिसरात घाटात पळणाऱ्या बैलांना जशी लाखांची किंमत मिळते, तशीच घोडीला सुद्धा लाखो रुपयांची किंमत मिळते.
पुणे जिल्ह्यातील एक शेतकरी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, त्याने आपल्या घोडीला चक्क फॉर्च्युनरमधून घरी आणले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. pic.twitter.com/sugYBzfEWc
— News18Lokmat (@News18lokmat) May 27, 2023
सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
मात्र विकत आणलेली तायर घोडी चांगली पळेल याची खात्री नसते. म्हणून बैलगाडा मालक छोट्या शिंगराला विकत आणून त्याला तयार करतात. या परिसरातले बैलगाडा मालक बैलांना आणि घोडीला आपल्या लेकराप्रमाणे जीव लावतात हेच या शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune